पाडोळी (धाराशिव) : कायदेशीर करार करून आणि रस्त्यासाठी लागणाऱ्या क्षेत्राचा मोबदला देऊनही खासगी ऊर्जा कंपनीची वाहने अडवून जादा दोन लाख रुपये व कमिशनचे एक लाख रुपये अशी एकूण तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास वाहने फोडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात पाडोळी (आ.) येथील तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशोमती नगर, मुरुम (ता. उमरगा) येथील रहिवासी आदेश तात्यासाहेब शिंदे (वय २८ वर्षे) हे ‘सूर्याग ऊर्जा लिमिटेड’ कंपनीत कार्यरत आहेत. कंपनीच्या वाहनांच्या ये-जा करण्यासाठी पाडोळी (आ.) येथील शेत गट क्रमांक २३७ मधील क्षेत्राचा मोबदला देऊन रीतसर करार करण्यात आला होता.
मात्र, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:०० वाजेच्या सुमारास आदेश शिंदे व त्यांचे सहकारी कर्मचारी पाडोळी (आ.) व टाकळी (बें.) येथील शेत शिवरस्त्यावरून जात असताना संशयित आरोपी अभिजीत गोविंद भोसले, आकाश गोविंद भोसले आणि गोविंद नामदेव भोसले (सर्व रा. पाडोळी आ., ता. जि. धाराशिव) यांनी संगनमत करून कंपनीची वाहने अडवली.
यावेळी आरोपींनी कराराचा मोबदला मिळालेला असतानाही जादा दोन लाख रुपये आणि कमिशनचे एक लाख रुपये अशा पैशांची बेकायदेशीर मागणी केली. तसेच, पैसे न दिल्यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत कंपनीची वाहने फोडून टाकण्याची आणि “परत या रस्त्याने वाहने घेऊन आलात तर जीवे मारून टाकीन” अशी धमकी दिली.
या प्रकारानंतर आदेश शिंदे यांनी त्याच दिवशी (१३ नोव्हेंबर) बेंबळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून बेंबळी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६(२) (बेकायदेशीररीत्या रस्ता अडवणे), ३०८(३) (खंडणी मागणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(२)(३) (गुन्हेगारी धमकी) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.




