डिकसळ (कळंब) : कळंब तालुक्यातील डिकसळ येथील संभाजीनगर भागातून एका तरुणाचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी गुप्तपणे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अपहृत तरुणाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोंदला (ता. कळंब) येथील मूळ रहिवासी व सध्या डिकसळ येथील संभाजीनगर भागात वास्तव्यास असलेल्या विद्या राजेश कदम (वय ३५ वर्षे) यांचे पती राजेश कदम हे संभाजीनगर, डिकसळ परिसरातून अचानक बेपत्ता झाले आहेत. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांना डांबून ठेवण्याच्या उद्देशाने गुप्तपणे व बेकायदेशीररीत्या पळवून नेल्याचा संशय त्यांच्या पत्नीने व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, विद्या कदम यांनी कळंब पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत प्रथम खबर दिली. त्यांच्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(३) (चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.




