ढोकी : ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वानेवाडी रोडलगत सुरू असलेल्या तिरट मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १३ जणांविरोधात कारवाई केली आहे. शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये रोख रक्कम व ९ मोबाईल असा एकूण १ लाख ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ढोकी पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना वानेवाडी रोडलगत असलेल्या हॉटेल कॉर्नरवाडा शेजारील एका पत्र्याच्या शेडमध्ये तिरट मटका नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता, तेथे काही जण पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, ९ मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १,४०,४०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी विशाल तात्यासाहेब वीर (वय ३१, रा. आळणी), राजाभाऊ तुळशीदास जगदाळे (वय ५०), निखिल भास्कर नाईकवाडी (वय ३४), बापू बजरंग करणावर (वय ४०), रणजित बाबासाहेब इंगळे (वय ३४), काका रविंद्र चव्हाण (वय ४०, रा. तेर), दयानंद पोपट आकोसकर (वय ३३, रा. कोळेवाडी), बालाजी गोपीनाथ इंगळे (वय ४५), विष्णू गजेंद्र मुंढे (वय ३३, रा. पवारवाडी), सोहेब सल्लाउद्दीन शेख (वय २८), संतोष रमेश फंड (वय ४०), संजय भाऊराव जाधव (वय ४३) आणि लक्ष्मण अंबादास राऊत (रा. तेर, ता. जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे.
सर्व आरोपींविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.



