कळंब : शेतीच्या वादातून सख्ख्या भावास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि बांबूच्या (येळूच्या) काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना कळंब तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी येथे घडली आहे. यावेळी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या आईलाही आरोपींनी ढकलून दिल्याने त्यांच्या मांडीचे हाड मोडून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मस्सा खंडेश्वरी (ता. कळंब, जि. धाराशिव) येथील रहिवासी प्रशांत सुभाष थोरात (वय ४३ वर्षे) यांच्याशी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. शेतीच्या वादाच्या कारणावरून संशयित आरोपी मनोज सुभाष थोरात आणि दिपाली मनोज थोरात (दोघे रा. मस्सा खंडेश्वरी, ता. कळंब) यांनी प्रशांत थोरात यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही आरोपींनी संगनमत करून प्रशांत थोरात यांना लाथाबुक्क्यांसह येळूच्या (बांबूच्या) काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. दरम्यान, हा वाद सुरू असताना फिर्यादीची आई भांडण सोडवण्यासाठी पुढे आल्या असता, आरोपीने त्यांना जोरात ढकलून दिले. खाली पडल्याने त्यांच्या मांडीचे हाड मोडून त्या गंभीर जखमी झाल्या.
उपचारानंतर प्रशांत थोरात यांनी १८ नोव्हेंबर रोजी कळंब पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी मनोज सुभाष थोरात आणि दिपाली मनोज थोरात या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२) (धोकादायक साधनाने गंभीर दुखापत करणे), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(३) (गुन्हेगारी धमकी) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.





