उमरगा : मोबाईल फोन चोरल्याच्या संशयावरून शिवीगाळ व मारहाण करत घरासमोर येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याने झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २४ वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात तिघांसह एका अनोळखी अशा चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औराद (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथील रहिवासी रोहन बालाजी कसबे (वय २४ वर्षे) या तरुणावर संशयित आरोपी जीतू काळे (रा. माडज, ता. उमरगा), माधव प्रभाकर सुरवसे, आनंद पांडुरंग गायकवाड (दोघे रा. औराद, ता. उमरगा) आणि इतर एका इसमाने मोबाईल फोन चोरल्याचा आळ घेतला होता. या कारणावरून आरोपींनी रोहनला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. इतकेच नव्हे तर, “मोबाईल फोन परत दिला नाही तर खून करतो” अशी थेट घरासमोर येऊन धमकी देत त्याचा छळ केला.
या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून रोहन कसबे याने १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:१५ वाजेच्या सुमारास कोरेगाव रोड-उमरगा बायपास रोडवरील प्रवीण माने यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेनंतर शालूबाई मारुती कसबे (वय ६० वर्षे, रा. औराद, ता. उमरगा) यांनी १८ नोव्हेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी जीतू काळे, माधव सुरवसे, आनंद गायकवाड आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(३) (जीवे मारण्याची धमकी), ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (अॅट्रॉसिटी) कलम ३(१)(आर), (एस) आणि ३(२)(व्ही.ए.) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.





