धाराशिव : खरीप २०२० मधील पीकविमा प्रकरणात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे २२७ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिल्याने माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि शेतकरी नेते अनिल जगताप यांनी उभारलेल्या न्यायालयीन लढ्याला मोठे यश मिळाले आहे.
या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ५७ हजार २८२ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. संबंधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जवळपास ९ हजार रुपये या प्रमाणात पीकविमा मिळणार असून, एकूण २२७ कोटी रुपयांची रक्कम येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होणार असल्याची माहिती माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली.
खरीप २०२० च्या पीकविमा प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढा देण्यात आला. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या विमा रकमेचा मार्ग मोकळा झाला आहे.
या लढ्यात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अतुल डख यांनी महत्त्वाची कायदेशीर भूमिका बजावली. तर शेतकरी नेते अनिल जगताप यांनी या प्रकरणासाठी आवश्यक माहिती संकलित करून न्यायालयीन लढ्याला मोलाचे सहकार्य केले. माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि अनिल जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
दुष्काळ आणि नापिकीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी रुपयांची ही मदत मोठा आर्थिक आधार ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभारलेल्या लढ्याला सर्वोच्च न्यायालयात यश मिळाल्याने जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे.
न्यायालयीन लढा जिंकला; आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बँक खात्यात पीकविमा जमा होण्याची प्रतीक्षा!





