वाशी (धाराशिव) : अनैतिक संबंधाच्या कारणावरून संगनमत करून एका २७ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्र आणि दगडाने मारहाण करून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना वाशी तालुक्यात उघडकीस आली आहे. सरमकुंडी ते भूम जाणाऱ्या रोड लगत कुंथलगिरीच्या डोंगरात हा रक्तरंजित प्रकार घडला असून, याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात एका महिलेसह दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोलेगाव (ता. वाशी, जि. धाराशिव) येथील रहिवासी गोविंद शिवाजी कागदे (वय २७ वर्षे) असे मयत तरुणाचे नाव आहे. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:०० ते २:०० वाजेच्या सुमारास रामकुंड शिवारातील सरमकुंडी ते भूम जाणाऱ्या रोड लगत कुंथलगिरीच्या डोंगरात ही घटना घडली.
संशयित आरोपी शुभम सुभाष खोसे (रा. चांदवड, ता. भूम, जि. धाराशिव) आणि अंजली गोविंद कागदे (रा. गोलेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी अनैतिक संबंधाच्या कारणावरून संगनमत करून गोविंद कागदे यास गाठले. यावेळी आरोपींनी त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच धारदार शस्त्र आणि दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात गोविंद कागदे यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर ज्ञानेश्वर बाजीराव कागदे (वय ३९ वर्षे, रा. गोलेगाव, ता. वाशी) यांनी १९ नोव्हेंबर रोजी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी शुभम सुभाष खोसे आणि अंजली गोविंद कागदे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून करणे) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे वाशी व भूम तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, वाशी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





