धाराशिव – येथील पत्रकार रविंद्र केसकर हल्लाप्रकरणी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार बनसोडे यास अटक करण्यात आली असून, केसकर यांच्यावर हल्ला का करण्यात आला, याचा छडा पोलिसांनी लावला आहे.
धाराशिव मधील बेंबळी रोड लगत सिध्देश्वर बेकरीच्या पुढे काही अंतरावर अनोळखी इसमांनी सांळुखे नगर येथील पत्रकार रविंद्र शिवाजी केसकर यांच्यावर दि. १ एप्रिल रोजी अज्ञात कारणावरुन चार ते पाच अनोळखी आरेापींनी त्यांची मोटरसायकल आडवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डाव्या गालावर कोयत्याने वार करुन जखमी करुन पळून गेले होते. त्यावरुन पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे गुरनं 139/2024 कलम 307, 341, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. प्रमाणे दि. 02.04.2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तांत्रीक विश्लेषणावरुन व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन आरोपी नामे- दत्तात्रय भरत नरसिंगे रा. तांदुळजा ता. जि. लातुर, यास गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल सह तांदुळजा येथुन ताब्यात घेवून त्याच्या कडे गुन्ह्याच्या संदर्भात कौशल्य पुर्ण रितीने सखोल चौकशी केली असता त्यांने सदरचा गुन्हा इतर दोन साथीदार व गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार प्रेमकुमार सुखदेव बनसोडे, रा. शाहुनगर धाराशिव याच्या नियेजनानुसार केला असल्याचे सांगितल्याने प्रेमकुमार सुखदेव बनसोडे याचा शिराढोण पोलीस ठाणे यांच्या मदतीने शोध घेवून त्यास शिराढोण पोलीस ठाणे हद्दीतीन जायफळ या गावातुन ताब्यातुन घेवून त्याच्या गुन्ह्या संदर्भात सखोल तपास केला असता त्यांने सदर गुन्हा हा त्याच्या साथीदारासह केल्याची कबुली दिली आहे.
हल्ला करण्याचे कारण आले समोर
शहरातील शाहूनगर भागात राहणारा पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार सुखदेव बनसोडे (वय 27) हा सांगलीच्या विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत होता. सात दिवसांची सुटी काढून बनसोडे हा गावी आला होता. जवळच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शुक्रवारी पाच ऑगस्ट 2016 रोजी सकाळच्या सुमारास ती घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेतला. आरोपी प्रेमकुमार बनसोडे याने मुलीला वह्या दाखविण्याच्या बहाण्याने स्वत:च्या खोलीत नेले आणि तुझ्यावर माझं प्रेम असल्याचे सांगत शरीरसंबंधांची मागणी केली. मुलीने नकार दिला तेव्हा त्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता.
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार बनसोडे यास दहा वर्षे सक्तमजुरी व एक लाख पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी सन २०१७ मध्ये सुनावली होती. सात वर्षे जेलची हवा खाल्यानंतर बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार बनसोडे हा तीन महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आला होता.
जेलच्या बाहेर आल्यापासून तो पत्रकार रविंद्र केसकर याच्यावर चिडून होता. पीडित मुलगी ही रविंद्र केसकर यांच्या ओळखीची असून, केसकर यांच्या सांगण्यावरून पीडित मुलीने प्रेमकुमार बनसोडे याच्यावर केस केली, असा त्याचा आरोप आहे. केसकरमुळे आपणास शिक्षा झाली, नोकरी गेली असा आरोप बनसोडे याचा आहे. यामुळे त्याने चिडून केसकर यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे.