धाराशिव – धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चना राणा जगजीतसिंह पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. लोकसभेचा आखाडा शुक्रवारपासून पेटणार असून, सध्या दोन्ही उमेदवारानी गावभेटीवर भर दिला आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी १२ ते १९ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. २० एप्रिल रोजी अर्जाची छाननी होणार आहे तर २२ एप्रिल रोजी अर्ज परत घेता येणार आहेत. २२ एप्रिल रोजी सायंकाळी किती उमेदवार रिंगणात उतरले हे स्पष्ट होणार असले तरी, महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चना राणा जगजीतसिंह पाटील या दीर आणि भावजयमध्ये बिग फाईट होणार असून, शुक्रवारपासून होणार वातावरण ‘टाईट’ होणार आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील धाराशिव-कळंब, तुळजापूर, उमरगा-लोहारा, भूम-परंडा या चार विधानसभा मतदारसंघाचा तसेच लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.तुळजापूर ( राणा जगजितसिंह पाटील ) , औसा ( अभिमन्यू पवार) आणि बार्शी ( राजेंद्र राऊत ) विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे , उमरगा-लोहारा ( ज्ञानराज चौगुले ) भूम-परंडा ( तानाजी सावंत ) या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत तर धाराशिव-कळंब ( कैलास पाटील ) विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेत फूट नव्हती. भाजप आणि शिवसेना मजबूत होती. राजकारणातून बाहेर पडलेले ओमराजे निंबाळकर यांना मोदी लाटेत खासदारकीची लॉटरी लागली. राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांचा दारुण प्रभाव झाला होता. लोकसभा निवडणुकीत पराभव होताच, राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि तुळजापूर विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळवून, आमदार म्हणून निवडून आले होते.यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय चित्र बदलले आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन भाग झाले आहेत. महायुती म्हणून आ. राणा पाटील, तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले एकत्र आले आहेत.
शिवसेनेच्या पाठीमागं उभं राहणारा मतदार यावेळी काय करणार?
धाराशिव जिल्ह्याचे नेते पद्मसिंह पाटील यांच्या प्रस्थापित राजकारणाला छेद देत मतदारांनी पहिल्यांदा रवींद्र गायकवाड आणि नंतर ओमराजे निंबाळकर यांना निवडून दिले. बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यामागे थांबणारा मतदार राजकीय फाटाफुटीनंतर कोणाला कौल देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ पद्मसिंह पाटील हे केवळ 6 हजार 787 मतांनी निवडून आले होते. डॉ. पाटील यांना 4 लाख 8 हजार 840 तर रवींद्र गायकवाड यांना 4 लाख 2 हजार 53 मते पडली होती. पद्मसिंह पाटील यांना 44.22 टक्के तर रवींद्र गायकवाड यांना 43.49 टक्के मते पडली होती.
2024 च्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी डॉ. पदमसिंह पाटील यांचा 2 लाख 35 हजार 325 मतांनी दारुण पराभव केला. रवींद्र गायकवाड यांना 6 लाख 7 हजार 699 मते तर पद्मसिंह पाटील यांना 3 लाख 73 हजार 374 मते पडली. पदमसिंह पाटील यांना 33 टक्के तर रवींद्र गायकवाड यांना 54 टक्के मते पडली होती. त्यानंतर 2019 मध्ये शिवसेने रविंद्र गायकवाड यांना उमेदवारी न देता ओमराजे निंबाळकर यांना मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता.
शिवसेना फुटीनंतर ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील ठाकरेंसोबत
शिवसेनेतील फाटाफुटीनंतर खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येनंतर ओम राजेनिंबाळकर हे राणा जगजीतसिंह पाटील यांच्या विरोधातच उभे राहणार हे मतदारसंघात सर्वांना माहीत आहे. आमदार कैलास पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याची भूमिका घेतल्याने या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतही रंगत येण्याची शक्यता आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ओम राजेनिंबाळकरांनी त्यांचा जनसंपर्क वाढवला आहे. दूरध्वनीवर प्रतिसाद देणारा अशी त्यांची ओळख आहे. उद्धव ठाकरे गटाचे राज्य स्तरावर ठरलेल्या कार्यक्रमापेक्षाही जिल्ह्यातील समस्या आणि त्यातून निर्माण होणारा रोष याच्या एकत्रिकरणावर ओम राजेनिंबाळकर भर देत आहेत.
कोण आहेत ओमराजे निंबाळकर ?
ओमराजे निंबाळकर यांचा जन्म 17 जुलै 1982 रोजी झाला. पवनराजे आणि आनंदीदेवी निंबाळकर हे त्यांचे पालक . ओमराजे निंबाळकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण उस्मानाबादमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी लातूरमध्ये शिक्षण घेतले. अभियांत्रिकेच्या शिक्षणासाठी त्यांनी पुणे शहर गाठले. मात्र, त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा खून झाल्यानंतर ते पुन्हा ( तेव्हाचे उस्मानाबाद) धाराशिवमध्ये परतले.
तरुणपणी ओमराजे निंबाळकर यांचा राजकारणात अजिबात रस नव्हता. मात्र, 2006 साली वडील पवनराजे निंबाळकर यांचा खून झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात ओमराजे निंबाळकर यांनी नवखे असूनही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कमाल करुन दाखवली. त्यांनी गावोगावी सभा घेऊन आपले उमेदवार निवडून आणले. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी ओमराजेंनी जिल्हा परिषेदत सत्तापालट केला. ओमराजे निंबाळकर यांनी डॉ. पाटील यांचा तेरणा साखर कारखानासह विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव केला.सन २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले, नंतर २०१९ च्या निवडणुकीत खासदार झाले.
कोण आहेत अर्चना पाटील?
अर्चना पाटील यापूर्वी धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होत्या, मात्र सध्या त्या कोणतेही पद सांभाळत नाहीत. लोकसभेच्या माध्यमातून त्या पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत.दरम्यान, अर्चना पाटील या सामाजिक कामात देखील अग्रेसर असतात. लेडीज क्लबच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. पुण्यातील भीमथडी किंवा मुंबईतील महालक्ष्मी सारख्या मोठ्या महोत्सवांसारखाच प्लॅटफॉर्म धाराशिव जिल्ह्यातील महिलांना मिळावा म्हणुन हिरकणी महोत्सवासारखी संकल्पना जिल्ह्यात आणली.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील बचत गटातील महिला उद्योजक या महोत्सवात दरवर्षी सहभागी होतात आणि लाखोंची उलाढाल करतात. तसेच तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून हजारो नागरिकांचे मोफत रोगनिदान, शेकडो नागरिकांच्या मोफत शस्त्रक्रिया, आरोग्य शिबिरांमध्ये मोफत साहित्य वाटप यासारखे उपक्रम त्या राबवत असतात.
राणा राष्ट्रवादी ते भाजप, पत्नीची राष्ट्रवादीत एंट्री
2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राणा जगजितसिंह यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाले. याआधी 2004 ते 2008 आणि 2008 ते 2014 या काळात दोन वेळा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. तर त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सुटलेल्या तिकीटासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला. व त्यांना तिकीट देखील जाहीर झाले आहे.
धाराशिव लोकसभेचा इतिहास
1952 ते 1991 याकाळात झालेल्या 9 लोकसभा निवडणुकांमध्ये धाराशिवच्या मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं. यामध्ये राघवेंद्र दिवाण, व्यंकटराव श्रीनिवासराव नळदुर्गकर, तुळशीराम पाटील, टी.एस. श्रंगारे, टी.एन. सावंत, अरविंद कांबळे यांनी धाराशिव जिल्ह्याचे नेतृत्व केले. तर चार वेळा खासदार राहिलेले अरविंद कांबळे हे मूळचे लातूरच्या उदगिरचे होते. 1984 ला ते पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर झालेल्या तीन लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांनी विजय मिळवला. त्यानतंर 1996 साली शिवसेनेचे शिवाजी कांबळे विजयी झाल्यानंतर मालिका खंडित झाली.
तरीही 1998 ला झालेल्या निवडणुकीतही ते खासदार म्हणून निवडून आले. अरविंद कांबळे प्रत्येकवेळी निवडून आल्यानंतर लगेच उदगीर गाठायचे आणि थेट पुढच्या निवडणुकीतच उगवायचे, असे देखील सांगितले जाते. 1984 ते 2009पर्यंत धाराशिव लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींच्या उमेदवारासाठी राखीव होता. या पंचवीस वर्षांमध्ये काँग्रेसचे अरविंद कांबळे, शिवसेनेचे शिवाजी कांबळे आणि कल्पना नरहिरे यांनी धाराशिवचे खासदार म्हणून काम पाहिले.
2009 ला हा मतदारसंघ खुला झाला आणि राज्याच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांनी त्यांना आव्हान दिलं. महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांनी त्या निवडणुकीत 6,787 मतांनी निसटता विजय मिळवला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र रवींद्र गायकवाड यांनी या पराभवाची परतफेड करत पद्मसिंह पाटील यांचा 2,35,325 मतांनी पराभव केला. त्या निवडणुकीत संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेची लाट पाहायला मिळाली होती आणि त्या लाटेवर स्वार होत रवींद्र गायकवाड यांनी पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.
अनेक वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे मंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या प्रस्थापित राजकारणाला छेद देणारी निवडणूक म्हणून 2014च्या निवडणुकीकडे पाहिलं गेलं. 2019मध्ये शिवसेनेने रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापलं आणि पद्मसिंह पाटील यांचे कौटुंबिक विरोधक असलेले ओमराजे निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील यांनी निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी 1,27,566 मतांनी विजय मिळवला.
धाराशिव लोकसभेत किती विधानसभा
औसा – अभिमन्यू पवार – भाजप
उमरगा – ज्ञानराज चौगुले – शिंदेंची शिवसेना
तूळजापूर- राणाजगजितसिंह पाटील – भाजप
धाराशिव – कैलास पाटील – शिवसेना ठाकरे गट
परांडा – डॉ. तानाजी सावंत – शिंदेंची शिवसेना
बार्शी – राजेंद्र राऊत – अपक्ष
धाराशिवमध्ये महायुतीची ताकद
धाराशिव लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लोहारा, परांडा, धाराशिव आणि तुळजापूर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
यापैकी औसा आणि तुळजापूर हे भाजपकडे, उमरगा आणि परांडा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आणि धाराशिव विधानसभा ही उद्धव ठाकरे गटाकडे आहे. बार्शीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या राजेंद्र राऊत यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता.
एकंदरीत महायुतीकडे सहापैकी पाच आमदार हे महायुतीचे आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटात राहिलेल्या कैलास पाटील यांच्या रुपाने मविआचा एकच आमदार या लोकसभा मतदारसंघात आहे. तर आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने बसवराज पाटील यांच्या रुपाने काँग्रेसच्या नेत्याला आपल्या गोटात घेण्यात यश मिळवलं आहे. तसेच विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण ( पदवीधर मतदारसंघ ) विक्रम काळे ( शिक्षक मतदारसंघ ) , सुरेश धस ( स्थानिक स्वराज्य संस्था ) हे देखील महायुतीचे असल्याने ओमराजे निंबाळकर यांना एकाकी लढत द्यावी लागणार आहे.