पक्या: (धान्याची पोती नीट लावत) “भावड्या, तुमचं राजकारण कसं ना, नुसता खेळ मांडल्यासारखा वाटतो. धाराशिवची निवडणूक लागली की सगळ्यांचे चेहरे बदलतात.”
भावड्या : (वृत्तपत्र वाचत) “बरोबर बोलतोस पक्या! आत्ता बघ, शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात तणाव वाढलाय. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कैलास पाटील आहेत, तर तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले हे शिंदे गटात गेले.”
पक्या: “अरे मग, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाची ताकद किती आहे? आधीच युती होती, आता काय होणार?”
भावड्या: “युतीतल्या बदलामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुती अशी दोन मोठ्या युतींची चर्चा आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस आहेत. आणि महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट.”
पक्या: “आता उमेदवार ठरवताना काय चाललंय? आपल्याला काय बरे मत द्यायचं?”
भावड्या: “त्यातच खरी गंमत आहे. महाविकास आघाडी टिकली तर धाराशिव आणि परंडा हे मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाला मिळतील म्हणतात. उमरगा आणि तुळजापूर काँग्रेसला मिळतील. पण महायुतीत भाजप आणि शिंदे गट एकत्र आले तर परंडा आणि उमरगा शिंदे गटाला, धाराशिव आणि तुळजापूर भाजपला मिळतील म्हणतायत.”
पक्या: “म्हणजे आता तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे का?”
भावड्या: “हो, तिरंगी लढतीसाठीही शक्यता आहे. दोन्ही युतीत फूट पडली किंवा बंडखोरी झाली तर नक्कीच. बंडखोर उमेदवारांना चांगले समर्थन मिळाले तर मुकाबला अधिक रंगतदार होईल.”
पक्या: “हे बघायला मजा येणार. आपल्याला मतदारांनी नीट विचार करून मत द्यायला हवं. आपण कोणाला पाठिंबा द्यायचा?”
भावड्या: “हो, पक्या! आपले मतदारसंघातले प्रश्न काय आहेत आणि कोण त्यांच्या सोडवण्याची क्षमता ठेवतो, ते बघावं लागेल. राजकारणात सगळं चालतं, पण मतदारांनी योग्य निर्णय घेतला पाहिजे.”
पक्या: “तुझं म्हणणं बरोबर आहे. चला, आधी आपलं काम करू. निवडणुका आल्या की या गप्पा सुरूच राहणार.”
भावड्या: “चला, कामाला लागू. निवडणुका येतील आणि जातील, पण आपलं जगणं तर आपल्यालाच पाहावं लागतं.”
( “गोफणगुंडा” सदराचे लेखक आहेत, धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे )