धाराशिव – धाराशिव नगरपरिषदेच्या हद्दीत मिळकत क्रमांक ४१२७ मध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने उभारलेल्या गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या पुतळ्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार, हा पुतळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाल्याने, येत्या ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तो हटवण्याची कार्यवाही नगरपरिषदेकडून करण्यात येणार आहे.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या सन्मानार्थ हा पुतळा उभारला होता. मात्र, यासाठी आवश्यक असलेली परवानगी घेण्यात आली नव्हती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी केली आणि पुतळा अनधिकृत असल्याचे निष्कर्ष काढले. यानंतर, पुतळा हटवण्याचे आदेश देण्यात आले
पुतळा हटवण्याची कार्यवाही संवेदनशील असल्याचे लक्षात घेऊन, नगरपरिषदेने यासाठी विशेष तयारी केली आहे. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना यावेळी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. याशिवाय, पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पुतळा हटवण्याच्या या कार्यवाहीमुळे धाराशिव शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अखेर मुख्याधिकारी फड यांना आली जाग
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने धाराशिव शहरात गुरुवर्य के. टी. पाटील यांचा पुतळा उभारला होता. मात्र, हा पुतळा विनापरवानगी उभारण्यात आल्याचे समोर आले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने 25 जुलै रोजी मुख्याधिकारी वसुधा फड यांना पुतळा हटवण्याचे आदेश दिले होते. तसेच, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतरही मुख्याधिकारी वसुधा फड यांनी पुतळा हटवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असल्याचे उपविभागीय अधिकारी कार्यालयाने म्हटले होते . त्यामुळे मुख्याधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, 24 तासांत समाधानकारक खुलासा न केल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता. अखेर मुख्याधिकारी फड यांना जाग आली आहे. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक ही कारवाई रविवार ऐवजी मंगळवारी ठेवली आहे.
मंगळवारी शाळेला सुट्टी द्या
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोसले हायस्कुल प्रांगणात हा पुतळा आहे. विद्यार्थाना पुढे करून पुतळा काढण्यास विरोध होण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून मंगळवार दि. ६ ऑगस्ट रोजी शाळेला सुट्टी ठेवावी आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात यावा, अशी मागणी आहे.
धाराशिव लाइव्हचा दणका
या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या माध्यमातून धाराशिव लाइव्हने केला आहे.