तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा गावात 18 ऑगस्ट रोजी विशाल गोटुराम काळे (वय 22) या तरुणावर जातीय शिवीगाळ करून पाच जणांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात विद्याधर जाधव, संकेत जाधव, प्रभाकर विनायक जाधव, श्रीकांत भोसले आणि कार्तिक धोत्रे यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:30 वाजता देवसिंगा गावाबाहेर वळणावर विशाल काळे यांना आरोपींनी अडवले. त्यांनी काळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीने आणि काठीने मारहाण केली. काळे यांचे मित्र देविदास भोसले आणि सुरज शिंदे हे भांडण सोडवण्यासाठी धावून आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर विशाल काळे यांनी 22 ऑगस्ट रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम 118(1), 115(2), 352, 351(3), 189(2), 191(3), 190 सह अ.जा.अ.ज.प्र.का. कलम 3(1)(आर), 3(1)(एस) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.