धाराशिव: शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आज धाराशिव येथे पार पडला. हा मेळावा शिवसेना संघटक सुधीर पाटील यांनी आयोजित केला होता, ज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तथापि, या मेळाव्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध होताच, दोन प्रमुख चुका निदर्शनास आल्या, ज्यामुळे शिवसैनिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
फेसबुक पोस्टमध्ये पालकमंत्री तानाजी सावंत यांचा उल्लेख उपस्थितांमध्ये करण्यात आला आहे,परंतु ते प्रत्यक्षात गैरहजर होते. याशिवाय, सुधीर पाटील यांचा उल्लेख जिल्हाप्रमुख म्हणून केला गेला आहे, जो आधीच वादाचा विषय ठरला आहे.
कालच मुख्यमंत्री शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्याच्या बातमीत सुधीर पाटील यांचा जिल्हाप्रमुख म्हणून उल्लेख करण्यात आला होता. यासंदर्भात धाराशिव लाइव्हने बातमी देताच, मुख्यमंत्री सचिवालयाने ही चूक दुरुस्त करत, सूरज साळुंके यांचा उल्लेख जिल्हाप्रमुख आणि सुधीर पाटील यांना संघटक म्हणून करण्यात आला होता. परंतु आज पुन्हा एकदा सुधीर पाटील यांचा जिल्हाप्रमुख म्हणून उल्लेख झाल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
सुधीर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजप सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याचे दिसत आहे, आणि आता जिल्हाप्रमुख पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.