धाराशिव जिल्ह्यात निवडणुकीची वेळ अजून यायची आहे, पण परंडा मतदारसंघात सध्या रणभूमी तयार आहे. विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये असणार आहेत, तरीही परंड्याच्या मातीवर धुराळा असा उठलाय की बघणारे चष्मा पुसायला लागले आहेत. मैदानात आहेत दोन तात्या, एक भैय्या, आणि सावंतांचे मोत्याने लखलखलेले नाक!
शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत, जे सध्या राज्याचे आरोग्य मंत्री, पालकमंत्री आणि धाराशिवचे ‘सर्वसामर्थ्यवान’ आमदार आहेत, त्यांच्याशी लढण्यासाठी ठाकरे गटाच्या दोन तात्या आणि राष्ट्रवादीचे ‘राहुल भैय्या’ एकत्र आलेत. पण हे तात्या-भैय्ये एकत्र आहेत की एकमेकांची तंगडी खेचण्यात गुंतलेत, हे अजून कोड्यातच आहे!
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ‘राहुल भैय्या मोटे’ सलग तीन वेळा निवडून आलेले होते. पण मागच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी त्यांची विकेट घेतली. आता मोटेंना परत फलंदाजीत यायचं आहे, पण समोर दोन तात्या उभे आहेत आणि ते दोघंही “आधी मी” च्या लढाईत आहेत.
पहिला तात्या म्हणजे शंकरराव बोरकर. मुंबईत उद्योगात बिझी असणारे हे तात्या निवडणुकीच्या वेळी परंड्याची आठवण काढतात आणि सणावाराला क्वचितच गावाची हवा घेण्यासाठी येतात. एकदा निवडणूक लढवली होती, पण त्यावेळी राहुल भैय्या मोटेंनी त्यांना परत मुंबईला पाठवलं होतं.
दुसरे तात्या म्हणजे ज्ञानेश्वर पाटील. तीन वेळा निवडणूक लढवली, एकदाच जिंकले, आणि दोनदा पराभूत झाले . या तात्यांना पराभूत करणारेही राहुल भैय्याच होते. आता हे दोघं एकाच गोटात असले तरी तिकीट मिळवण्यासाठी एकमेकांच्या कानावर आवाज पोचवतायत!
या सगळ्या गोंधळात तानाजी सावंत मात्र निवांत आहेत. कारण, त्यांच्या हातात आहे “पैसा”. ते निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या सगळ्या नीती वापरायला तयार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तानाजी सावंत यांना परंड्याच्या मैदानात एकेकाळी ज्ञानेश्वर तात्यांनीच आणला होता, पण आता सावंतांचे मोती एवढे जड झालेत की त्यांना हटवणं म्हणजे मुळात तात्यांच्या अंगावर वजनकाठी मारल्यासारखं झालंय.
आता नोव्हेंबर आला की हा धुराळा कसा मिटतो हे बघायला परंड्याचे लोक थांबलेत. एकीकडे तात्या-भैय्यांचे अंतर्गत युद्ध आणि दुसरीकडे सावंतांचा ‘पैसा’ असा सामना रंगणार आहे. मतदार मात्र विचारात आहेत, “आता कुठला तात्या किंवा भैय्या आपल्यावर भारी पडतोय?”
– बोरूबहाद्दर