धाराशिव – एकाने म्हणायचं माझा बाप मारला आणि दुसऱ्यांनी म्हणायचं माझा त्यात काही संबंध नाही, दोघांनीही खुशाल झोपायचं आणि शेतकऱ्याचा संसार देशोधडीला लावायचा या लायकीचे हे दोघेजण आहेत असं म्हणत राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी खा. ओमराजे निंबाळकर आणि आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका केली.
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांचा मेळावा आयोजित कऱण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. दोघाच्या भांडणात लोकांच्या घरांना आग लागली तरी चालेल पण आपण निवांत झोपले पाहिजे अशा मताची ही लोक आहेत असेही सावंत यांनी म्हटले, तुमचं घरगुती भांडण आहे पण माझ्या शेतकऱ्यांचा संसार देशोधडीला लावण्याचे काम तुम्ही केलं असल्याचा आरोप ही सावंत यांनी केला.
मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून आपल्या तेरणा कारखान्याची ओळख होती. त्यावर साडेचारशे कोटी कर्ज करून शेवटी कारखाना बंद पाडला , बंद पडलेल्या कारखान्यातील भंगार देखील विकले. अनेक वर्षे हा कारखाना बंद होता, आपण तो कारखाना सुरु केला, मात्र या दोन भावांच्या पोटात पोटशूळ उठले आहे.
तुमचे घरगुती भांडण, तीच कॅसेट किती दिवस चालवणार ? पंधरा वर्षे होऊन गेले. मुलाला नातू झाला तरी तेच सुरू आहे. तुमची मुले परदेशात शिकतात आणि आमची मुले कामासाठी पुणे मुंबईला जातात. शेतकरी देशोधडीला लागला आहे. तेरणा कारखाना २० वर्षे भाड्याने घेतला आहे, तो विकत घेणार नाही. शेवटी सभासदांच्या हाती सोपवणार असे सावंत यांनी सांगितले.