तुळजापूर – विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजायला अजून थोडा वेळ आहे, पण उमेदवारांचे गुडघे मात्र बाशिंग बांधून तयार झाले आहेत! आचारसंहितेची धडधड सुरु असताना, राणा दादा उर्फ राणा जगजितसिंह पाटील यांचे स्वप्न अजूनही पालकमंत्रीपदाच्या पायऱ्यांवर रेंगाळत आहे. यंदा मात्र ते महिलांच्या मनावर राज्य करण्यासाठी गावोगावी ३०० रुपयांच्या साड्या वाटत फिरत आहेत. साडीचा रंग, डिझाइन आणि क्वालिटी यातच मतदारांना गोंधळून टाकायचे त्यांचे ‘मास्टरप्लॅन’ आहे.
यांच्या विरोधात मात्र तब्बल आठ धुरंदर दंड थोपटून उभे आहेत. “अभी तो मै जवान हूँ” म्हणत, ९० वर्षांचे मधुकरराव चव्हाण मतदारसंघात धावत आहेत. त्यांच्या धावण्याने पक्षातील ऍड. धीरज पाटील यांच्या मनात “आण्णां, आता पुरे करा” असे ओरडण्याची वेळ आली आहे. धीरज पाटील सुद्धा गावोगावी सभा घेत चव्हाण साहेबांना निवृत्तीची सूचना देत फिरत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीत गेल्यापासून “भाऊ लढणार, बदल घडणार” या घोषणा देणारे अशोक जगदाळे उर्फ भाऊ पुन्हा मैदानात उतरण्यास तयार झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे चमचे भरभरून हवा करत आहेत, पण ही हवा निवडणुकीच्या दंगलीत टिकल का, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या वादळी वातावरणात भाऊंच्या पक्षांतराच्या गोष्टींनी सुद्धा रंग भरले आहेत.
या सर्व गोंधळात ऍड. व्यंकट गुंड, ज्यांनी कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी असे चार-पाच वेळा पक्ष बदलले आहेत, त्यांनी आता आपल्याच पक्षाच्या राणा दादांच्या विरोधात उडी घेतली आहे. “मला उमेदवारी द्या नाहीतर मी बंडखोरी करणार” असे ते दम देत आहेत, पण बंडखोरीच्या फुसक्या गर्जनांनी मात्र कुणालाच फारसं घाबरवलं नाही!
शेवटी, अपक्ष अण्णासाहेब दराडे यांनी मात्र सगळ्यांना मागे टाकत ‘एकला चलो रे’ या मंत्रावर जोर दिला आहे. गावोगावी फिरून स्थानिक समस्या मांडत आहेत आणि इतिहास घडवण्याचा दावा करत आहेत. पण यंदा इतिहास घडतो की इतर उमेदवारांप्रमाणे हवेत विरतो, हे येणारा काळच ठरवेल!
तर तुळजापूरच्या या गंमतीदार निवडणुकीत साड्या, हवा आणि पक्षांतरांची धमाल बघण्यास सज्ज व्हा!