तुळजापूर – नवरात्र उत्सवाच्या जल्लोषात महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं नाव घेतलं जातंय, पण या जयघोषात आमचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे साहेब मात्र ‘सीमोल्लंघन’ खेळतायत! कसं काय, विचाराल? तर गुरुवारी घटस्थापना झाली, आणि तिथेच साहेबांचा नशीबही उध्वस्त झालं.
आता हे असं काय झालंय? धाराशिवचे सत्यशोधक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी घटस्थापनेच्या पवित्र दिवशी साहेबांच्या ‘नॉन क्रीमी लेअर’ प्रमाणपत्राचं बोगस प्रकरण बाहेर काढलं! अहो, हे प्रकरण महाराष्ट्रभर चर्चा आहे! साहेबांच्या चेहऱ्यावरच्या हास्याचं सीमोल्लंघन झालं आणि मूड चांगलाच गडबडलाय.
पण हेच काय? ह्यापुढे ऐका. तुळजाभवानी मंदिरापासून निघालेले साहेबांचे वाहन जरा पुढे आलं असता, येडशीचा एक देवीभक्त मोटारसायकलवरून समोर आला आणि साहेबांच्या गाडीला धडक दिली! अहो, होय, डॉ. ओंबासे साहेब यांची सरकारी चारचाकी गाडी आणि येडशीवाल्याची दुचाकी गाडी समोरासमोर धडकली. साहेबांच्या गाडीचं किरकोळ नुकसान झालं, पण ह्यापेक्षा मजेदार भाग पुढे आला.
साहेबांच्या गाडीत असलेल्या पोलिसानं येडशीच्या देवीभक्ताला चटकन धरलं, ट्रॅफिक पोलिसांच्या स्वाधीन केलं, आणि तिथेच 1000 रुपये दंड ठोठावला! एवढंच नाही, तर गाडीही जप्त केली. सध्या गाडी पोलिस ठाण्यात शांत झोपतेय, पण गुन्हा का दाखल नाही, म्हणून चर्चेची बरीच धुमाळी चालू आहे. वरिष्ठ साहेब दंड करणाऱ्या पोलिसाला गुन्हा दाखल का केला नाही म्हणून उठा- बशा करायला लावत आहेत.
आता प्रश्न असा आहे, चूक मोटारसायकलवाल्याची की साहेबांच्या ड्रायव्हरची? पण, मोठ्या माणसांचा प्रश्न असला की छोटी माणसं फटकवली जातात, हे मात्र नक्की!