तुळजापूर – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याच्या कायापालटाचा संकल्प सोडला आहे. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असून, भविष्यातही आणखी वेगाने काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानताना आमदार पाटील म्हणाले की, “एवढी अफाट आपुलकी आणि निरपेक्ष प्रेम वाट्याला येणे हे खरंच भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या स्नेहाने आणि मायेने पुरता भारावून गेलो आहे.” जिल्ह्याच्या विकासात जनतेच्या सहकार्याचे मोठे महत्व असल्याचे सांगत ते म्हणाले की, “आजवर अनेक संकटांवर मात करीत आपण मिळवलेल्या प्रत्येक यशात तुमच्या सर्वांचाही मोठा वाटा आहे. आपण सर्वांनी मोठ्या विश्वासाने नेहमी दिलेल्या सोबतीचा हा परिपाक आहे.”
आमदार पाटील यांनी संतश्रेष्ठ गोरोबाकाका आणि जगन्माता कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेत जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी कठोर परिश्रम करण्याचा संकल्प केला आहे. “आपल्या जिल्ह्याचा कायापालट हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आणखी वेगाने काम करणार आहे,” असे ते म्हणाले.
आमदार पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आणि जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.






