तर मंडळी, उमरगा-लोहारा विधानसभा निवडणूक २०२४ चा बिगुल वाजलाय आणि ह्या निवडणुकीची रंगत म्हणजे काय सांगू! उमरगा म्हटलं की, संपूर्ण मतदारसंघाला माहित असलेली तीच जुनी गाथा डोळ्यासमोर उभी राहते – रवींद्र गायकवाड विरुद्ध बसवराज पाटील. हे दोन नावे ऐकताच साऱ्या मतदारसंघाला आधीच्या निवडणुकीच्या पान पानावरच्या लढाया आठवतात.
तर झालं असं की १९९५ मध्ये या दोघांत पहिला सामना रंगला. तेव्हा शिवसेना विरुद्ध काँग्रेसचा मुख्यत: सामना होता, पण या दोघांच्या वैयक्तिक वर्चस्वाच्या जोरावर रंगत वाढली. लोकांचे लक्ष केवळ पक्षाच्या मुद्द्यावरून हलून व्यक्तीरेखांवर गेलं. त्या पहिल्या सामना गायकवाडांनी लीलया जिंकला आणि उमरग्याचं मैदान फोडलं.
१९९९ मध्ये पाटील साहेबांची जोरदार पुनरागमनाची तयारी झाली होती. त्यांनी गायकवाडांना हरवून विजय मिळवला आणि मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली. या वर्षीची निवडणूक म्हणजे दोघांच्या संघर्षातला सीन नंबर दोन. मतदारांनी त्यांच्या यशाचं कौतुक केलं, पण हे नातं एकतर्फी टिकावं, हे अजून दोघांपैकी कुणालाच पटलं नव्हतं.
२००४ मध्ये पुन्हा गायकवाडांनी जोरदार एन्ट्री घेतली आणि पाटील यांना मागे टाकत विजयाची माळ गळ्यात घातली. हे चित्र बघून सर्वांना वाटलं की आता ह्या दोन वीरांच्या सिरीजला तिसऱ्या लढाईत पुरा पडणार! पण २००९ मध्ये अचानकच मतदारसंघाला “राखीव” ठरवलं गेलं. मग काय, एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हे दोघेच यातून बाहेर फेकले गेले!
गायकवाडांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर पाटील साहेबांनी औसा विधानसभा मतदारसंघात उतरून मैदान राखलं. त्यात एकदा गायकवाड विजयी झाले, पण एकदा हार पत्करली. तसंच पाटील साहेबांनीही २००९ आणि २०१४ मध्ये विजय मिळवला, पण २०१९ मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. असे हे दोन विरोधक मतदारसंघाच्या भूमिकेपासून काही काळ दूर गेले, पण त्यांची ओळख मात्र कायम राहिली.
अशात २००९ मध्ये या रिक्त झालेल्या मैदानात एका नवीन खेळाडूची एन्ट्री झाली – ज्ञानराज चौगुले! गायकवाड साहेबांचे शिलेदार असलेल्या चौगुले साहेबांनी हा नवा किल्ला पटकावला आणि सलग तीन निवडणुकांमध्ये मैदान मारलं. २००९, २०१४ आणि २०१९ अशा तिन्ही निवडणुकांमध्ये चौगुले विजयी ठरले आणि मतदारसंघातील आपल्या स्थानाची पक्की गुढी बांधली.
मात्र, २०२४ च्या निवडणुकीत अजब ट्विस्ट आलाय. शिवसेनेत फुट पडल्यामुळे आता चौगुले साहेब शिंदे गटात असून, प्रवीण स्वामी ठाकरे गटातून रिंगणात आहेत. आता खरी गंमत अशी की हे दोन कट्टर विरोधक – रवींद्र गायकवाड आणि बसवराज पाटील – आता एकाच बाजूला आले आहेत! एकेकाळी एकमेकांच्या विरोधात रणांगणावर उभे असलेले हे दोघे आता महायुतीच्या बॅनरखाली एकत्र आलेत. या महायुतीत ते एकत्र चौगुले साहेबांचा प्रचार करत आहेत. म्हणजे परस्पर विरोधी विचार असलेले दोघे आता एकाच छत्राखाली येऊन ‘चौगुले सहोदर’ प्रचाराचे नारे देताहेत!
या निवडणुकीत परंपरेला फाट्यावर मारून विरोधकांनी एकत्र येऊन एकाच झेंड्याखाली लढायचं ठरवलंय, हे पाहणं खरंच मजेशीर आहे. राजकीय इतिहासात यांना पाहून कुणीतरी नव्या गाण्याची ओळ लिहावी लागेल, “काल परवाचे विरोधक आज झाले दोस्त!”
तर, उमरगा-लोहारा विधानसभा निवडणूक म्हणजे निव्वळ उमेदवारांची लढाई नाही, तर मित्र-शत्रूच्या जोड्या, अनपेक्षित युती, आणि मतदारांना कधीही न बघितलेला कॉमेडी शो आहे! आता या सगळ्या गदारोळात मतदार कोणाला साथ देणार, हेच पाहायचं!
– बोरूबहाद्दर