धाराशिव – सुरुवातीच्या टप्प्यात बारदाण्याच्या तुटवड्यामुळे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला होता व अपेक्षित ओलावा नसल्याने खरेदीला वेग येत नाही ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर नोंदणीसाठी पुन्हा एकदा १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. नाफेडकडे आता १५ डिसेंबरपर्यंत सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे सोयाबीन विकण्याची घाई न करता शेतकरी बांधवांनी खरेदी केंद्राकडेच नोंदणी करावी. आजवर जिल्ह्यातील १७ हमीभाव खरेदी केंद्रांवर निकषात बसणाऱ्या तब्बल २५ हजार क्विंटल सोयाबीनची रु.४८९२ या हमीभावने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील १७ हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीन खरेदी मोठ्या वेगात सुरू आहे. सुरूवातीच्या काळात बारदाण्याच्या तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरेदी प्रक्रियेत विलंब निर्माण झाला होता. फेडरेशनकडे पाठपुरावा करून बारदाना निविदा प्रक्रिया तातडीने राबवून जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून घेतला होता त्यामुळे हमीभाव केंद्रांवर खरेदी प्रक्रियेला गती आली आहे. परिणामी खुल्या बाजारातही सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन विकण्याची घाई न करता नोंदणीसाठी दिलेल्या पुढील १५ दिवसांच्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्यावा. सध्या जिल्ह्यातील १७ हमीभाव खरेदी केंद्रांवर बारदाना मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळेच खरेदीलाही मोठी गती मिळत असल्याचे चित्र आहे. ज्या शेतकर्यांनी फेडरेशनकडे नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून सोयाबीन खरेदी केंद्रावरच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील भूम, दस्तापूर, गुंजोटी, ईट, नळदुर्ग, कळंब, वाशी, उमरगा, धाराशिव, सोन्नेवाडी, चिखली, शिराढोण, टाकळी बें, तुळजापूर, कानेगाव, कनगरा, चोराखळी आदी १७ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत.गरज पडली तर त्यात वाढ करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करू.आतापर्यंत २५ हजार हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. अनेक शेतकर्यांच्या खात्यावर चार हजार ८९२ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे पेमेंटही जमा करण्यात आले आहे. यापूर्वी नोंदणीसाठी १५ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. त्यात वाढ करून ३० नोव्हेंबर करण्यात आली होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आत पुन्हा एकदा नोंदणीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्री करण्याची घाई न करता १५ डिसेंबरपूर्वी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.