धाराशिव – धाराशिव शहरातील भोसले हायस्कूल समोरील रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून एका ३३ वर्षीय व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किर्तीकुमार कोळी (३३, रा. तांबरी विभाग, धाराशिव) हे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भोसले हायस्कूल समोरील रस्त्याने जात असताना कुणाल काळे (रा. भोसले हायस्कूल समोर, धाराशिव) याने त्यांना रस्त्यात अडवले. त्यानंतर काळे याने कोळी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर हातातील कढ्यानेही त्यांना मारहाण करून जखमी केले.
या मारहाणीत कोळी यांना दुखापत झाली असून त्यांच्या खिशातील १,७०० रुपये काळे याने काढून घेतले. तसेच, “तू माझ्यावर केस केलास तर तुला जिवे मारील,” अशी धमकीही दिली.
या घटनेनंतर किर्तीकुमार कोळी यांनी १ डिसेंबर २०२४ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कुणाल काळे याच्याविरुद्ध भादंवि कलम १२६(२), ११९(१), ११८(१), ३५२, ३५१(२) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.