धाराशिव: निफाड येथील सागर महामीने नावाच्या भाविकाची फोर्स ट्रॅव्हलरमधून 44,750 रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. महामीने हे कुटुंबासह तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना वाटेत वडगाव शिवारात सिध्देश्वर महादेव मंदिराजवळ ही घटना घडली.
महामीने हे 8 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजता निफाडहून आपल्या फोर्स ट्रॅव्हलर गाडीने (क्रमांक MH 04 GP 1094) तुळजापूरकडे निघाले होते. वडगाव शिवारात सिध्देश्वर महादेव मंदिराजवळ अनोळखी तिघांनी त्यांच्या गाडीचा मागील दरवाजा उघडून आतील मोरपंखी बॅग चोरून नेली.
या बॅगेत 75 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या देवाच्या मूर्ती, 4 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, बेंटक्सचे दागिने, कपडे, रोख 15,000 रुपये आणि नवरा-नवरीचे कपडे होते. याप्रकरणी महामीने यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.