तुळजापूर: तालुक्यातील मुर्टा येथील शेतकरी सतीश विश्वनाथ दराडे यांच्या गट क्रमांक ६५ मधील दीड एकर जमिनीतून रिनिव्ह कंपनी गेल्या सहा महिन्यांपासून पवनचक्कीसाठी अवजड वाहनांची ये-जा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दराडे यांच्याकडून कोणताही करार न करता किंवा परवानगी न घेता कंपनीने त्यांच्या जमिनीतून जबरदस्तीने रस्ता तयार केला आहे. याबाबत दराडे यांनी कंपनीकडे विचारणा केली असता त्यांना दमदाटी करण्यात आली.
कंपनीच्या या मनमानी कारवाईमुळे दराडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून प्रशासन मात्र गप्प बसल्याने संतापाची लाट पसरली आहे.
तुळजापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कंपन्यांच्या दादागिरीला कंटाळून अनेक शेतकरी त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येवर प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.