नळदुर्ग : श्री खंडोबा – बाणाई विवाह स्थळ असलेले मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबा हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. सध्या श्री खंडोबाचा यात्रोत्सव सुरू असून दररोज भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. दर रविवारी यात्रा भरत असून १३ जानेवारी रोजी महायात्रा आहे.
परंतु, यात्रेत वाढत्या चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. २२ डिसेंबर रोजी भरलेल्या यात्रेत किमान सात-आठ महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास झाले असून, काही जणांचे खिसे रिकामे झाले आहेत. दर रविवारी भरणाऱ्या यात्रेत चोरांचा सुळसुळाट वाढला आहे.
यात्रेत पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी करणारे पत्र श्री खंडोबा देवस्थान समितीने नळदुर्ग पोलिसांना दिले आहे. परंतु, पोलीस बंदोबस्त दिला जात नाही. गर्दी झाल्यानंतर नळदुर्ग पोलीस स्टेशनला वारंवार फोन केल्यानंतर एखादा पोलीस येतो आणि पाच ते दहा मिनिटे उभे राहून गायब होतो, असा अनुभव आहे.
पोलिसांच्या या उदासीनतेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलीस आणि चोरांचे सांठगांठ आहे का? अशी शंका भाविक व्यक्त करीत आहेत.
पोलीस नसल्यामुळे भाविकांमध्ये रांगेत दर्शन होण्याऐवजी काही जण थेट मंदिर गाभाऱ्यात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे शिवीगाळ, भांडणे, हाणामारी होत आहे. परंतु, पोलिसांना त्याचे काहीच गांभीर्य वाटत नाही.
भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने यात्रेत बंदोबस्त वाढवावा आणि चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.