कळंब – कळंब बसस्थानकावर एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ब्रम्हदेव अशोक क्षिरसागर (वय ३४, रा. बार्शी, जि. सोलापूर, ह.मु. धारुर, जि. बीड) यांच्या पत्नी २५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता कळंब बसस्थानकावरून सातारा बस पकडण्यासाठी आल्या होत्या. बस चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची, ५०,००० रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली.
याप्रकरणी ब्रम्हदेव क्षिरसागर यांनी २ जानेवारी २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी भादंवि कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
वाशीत घराचे कुलूप तोडून ४४,५०० रुपयांचे दागिने चोरी
वाशी – वाशी तालुक्यातील पिंपळवाडी येथे एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४४,५०० रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. बालाजी सुंदर करबंदे (वय २५, रा. पिंपळवाडी) यांच्या घराचे कुलूप ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत अज्ञात चोरट्यांनी तोडले. घरात प्रवेश करून कपाटातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि काही चांदीचे दागिने असा एकूण ४४,५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी बालाजी करबंदे यांनी २ जानेवारी २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम ३३१ (३), ३०५(ए) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असून फिंगरप्रिंट तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.