तुळजापूर: सिंदफळ (ता. तुळजापूर) येथील गट क्रमांक १७६ च्या जमिनीचे बोगस बिगरशेती आदेश काढून जमीन खरेदी-विक्री केल्याप्रकरणी विक्रेता पवनजित कौर गिरवीरसिंग सुखमणी आणि खरेदीदार सतिश सोपानराव पैरणाळे या दोघांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी तुळजापूर पोलिसांना दिले आहेत.
याबाबतची तक्रार तहसीलदार बोळंगे यांनी ८ जानेवारी रोजी पोलिसात दिली होती. मात्र, चार दिवस उलटूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढवळे यांनी धाराशिव तहसील कार्यालयात केलेल्या तपासणीत बिगरशेती संचिकेत अनियमितता आढळून आली. विशेष म्हणजे, कार्यालयातील लिपिक शुभम काळे हा स्वतः नायब तहसीलदारांची सही न घेता बिगरशेती संचिका तहसीलदारांपर्यंत पोहोचवत होता. काळे यांची नियुक्ती तुळजापूर तहसील कार्यालयात असताना त्यांची धाराशिव तहसील कार्यालयात कशी नियुक्ती करण्यात आली, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.
शुभम काळे याची नेमणूक तुळजापुरात असताना तो धाराशिव तहसील कार्यालयात काम करतो. तो बोगस कामे करीत असल्याची चर्चा आहे. त्याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी असल्याचे बोलले जाते. त्यानेच ही बोगस कामे केल्याचे समोर आले आहे.