धाराशिव: धाराशिव शहर पोलीसांनी अवैध गोमांस वाहतूक करणाऱ्या टॅम्पो चालकावर कारवाई केली आहे. धाराशिव ते वैराग रस्त्याजवळ सय्यद प्लॉटींग मध्ये भोगावती नदीच्या काठाजवळून गोवंशीय मांसाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आयशर टॅम्पो (क्र. एम.एच. 11 डी.डी. 3883) थांबवला. तपासणी दरम्यान टॅम्पोमध्ये सुमारे 3000 किलो गोवंशीय मांस आढळून आले.
टॅम्पो चालक शाहरुख निसार पिंजारी (वय 27, रा. माळी गल्ली, नागनाथ रोड, धाराशिव) याला मांस वाहतूक परवाना दाखविण्यास सांगितले असता त्याच्याकडे परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अंदाजे 16 लाख रुपये किमतीचे मांस आणि 6 लाख रुपये किमतीचा टॅम्पो जप्त केला आहे. जप्त केलेल्या मांसांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
पशुधन विकास अधिकारी डॉ. कमलाकर शेळके यांच्यामार्फत मांसाचे नमुने घेण्यात आले आहेत. धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राम कनामे यांनी महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम 5 (सी), 9 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी शकील शेख, सपोनि कुकलारे, पोउपनि संदीप ओव्होळ, पोहेकॉ/ आनंत आडगळे, पोअं राम कनामे, प्रविण जमादार, सुधीर मुगळे, चालक सपोफौ हावळे, पोअं जगताप यांच्या पथकाने केली आहे.