तुळजापूर: तुळजापूर शहरातील एस.टी. कॉलनी येथील राहत्या घराचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ७१ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुहास बबन सोनवणे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास सोनवणे हे सध्या पुण्यातील देशमुखवाडी येथे राहतात. तुळजापूर येथील त्यांचे राहते घर सध्या बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने १८ जानेवारी रोजी रात्री घराचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील चांदीच्या चार मुर्त्या (२५० ग्रॅम), एक किलो वजनाची चांदीची मूर्ती, ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे भांडे, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ७१ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
सुहास सोनवणे यांनी १९ जानेवारी रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर करत आहेत.