धाराशिव – पी.एम. कुसुम योजना आणि ‘मागेल त्याला सोलर पंप’ योजनेतून शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रकार सुरू असून, सरकारच्या धोरणाविरुद्ध संताप व्यक्त करीत कंपन्या मालामाल होत असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करून त्यांना कर्जबाजारी करण्याचा खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
योजनेच्या पार्श्वभूमीवर सोलर पंपांसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती दयनीय असल्याचं समोर आलं आहे. कुसुम योजनेत 7,000 अर्जांपैकी 3,300 शेतकऱ्यांनी पैसे भरले असून, मुदत संपल्यानंतरही त्यांना सोलर पंप बसवून मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांकडून मुरूम, खडी यांसारख्या साहित्याची मागणी केली जात आहे. नियमानुसार 120 दिवसांत सोलर पॅनल बसवणे बंधनकारक आहे; मात्र दंडाच्या तरतुदी असूनही एजन्सींकडून विलंब होत आहे.
‘मागेल त्याला सोलर पंप’ योजना निव्वळ दिखावा
या योजनेत 55,000 अर्जांपैकी फक्त 3,000 अर्जांची छाननी झाली आहे. यापैकी 700 शेतकऱ्यांकडून पैसे घेतले असले तरी अद्याप एजन्सीची निवडदेखील झालेली नाही. यामुळे पैसे भरलेले असतानाही शेतकऱ्यांना सोलर पंप मिळालेला नाही. निवडणुकीपूर्वी घोषणांचा धडाका लावून शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्यात आले, मात्र नंतरच्या स्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
आर.डी.एस.एस. योजनेचाही संथ वेग
आर.डी.एस.एस. योजनेची कामे देखील अतिशय संथ गतीने सुरू आहेत. 15 महिन्यांत फक्त 40 टक्के काम पूर्ण झालं असून, उर्वरित 60 टक्के काम जूनपर्यंत पूर्ण होणार का, असा प्रश्नही आमदार पाटील यांनी उपस्थित केला. त्यांनी ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांना गाजर दाखवून त्यांचं शोषण करण्याचं धोरण सरकारने स्वीकारलं असल्याचा आरोप करताना, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठोस उपाययोजनांची मागणी आमदार पाटील यांनी केली.