धाराशिव : शहरातील विकास नगर भागात एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ९३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. कामानिमित्त घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी हा डल्ला मारला असून, याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी बाळासाहेब गंगाधार पाटील (वय ६३, रा. रायगड फंक्शन हॉलच्या पाठीमागे, विकास नगर, धाराशिव) आणि योगेश फुलसे हे दोघे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. बंद घराची पाळत ठेवून अज्ञात चोरट्यांनी २४ एप्रिल रोजी रात्री ११ ते २५ एप्रिलच्या पहाटे ५ वाजेच्या दरम्यान घराचे कुलूप तोडले.
घरात प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातील सामानाची उचकापाचक केली. यात त्यांनी ६९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ९३ हजार ७६० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
बाहेरगावाहून परतल्यानंतर घरफोडी झाल्याचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बाळासाहेब पाटील यांनी ३ मे रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







