धाराशिव शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही शहरात वाहतुकीच्या नियमनासाठी एकाही ठिकाणी सिग्नल नाही. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसतो. वाहतूक पोलीस रस्त्यांवर अथवा चौकांमध्ये दिसत नाहीत, उलट ते टपऱ्यांवर किंवा चहाच्या दुकानांवर बसलेले पाहायला मिळतात.
शहरात ट्रिपल सीट जाणे, रॉंग साईडने वाहन चालवणे हे नित्याचे झाले आहे. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः बसस्थानक परिसरात फळविक्रेते रस्त्यावर गाडे लावत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच रॉंग साईडने वाहन चालवल्याने अपघात घडण्याचे प्रमाण अधिक झाले आहे.
मंगळवारी सायंकाळी बसस्थानकासमोर घडलेल्या घटनेने यावर शिक्कामोर्तब केले. रॉंग साईडने आलेल्या एका मोटारसायकलस्वाराने महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेला हाताला गंभीर दुखापत झाली. या प्रकारांमुळे नागरिकांत तीव्र असंतोष आहे.
महिलेला धडक दिल्यानंतर वाहतूक कोंडी झाली, मग चहाच्या दुकानात बसलेले पोलीस पळत आले , मात्र रॉंग साईड आलेल्या मोटारसायकलस्वारावर कारवाई न करता, चिरीमिरी घेऊन सोडून दिले. गरीब दिसला की , त्याला दमदाटी करणे, चिरीमिरी उकळणे आणि श्रीमंत दिसला की त्याला सलाम करणे, असे वाहतूक पोलिसांचे झाले आहे. कागदपत्र तपासणीच्या नावाखाली पोलीस गरीब लोकांना लुटत असल्याचा आरोप होत आहे.
वाहतूक पोलिसांचा शहरातील कारभार फक्त शोभेच्या बाहुल्यांप्रमाणे झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात वाहतुकीच्या समस्येचे स्वरूप अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.