तुळजापूर: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील सुरक्षा रक्षक व स्वच्छता कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे कर्मचारी स्थानिक भूमिपुत्र असून गेल्या १५ वर्षांपासून काम करत आहेत.
अमोल शिवाजीराव जाधव यांनी याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री . एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी मंदिर संस्थानमधील सर्व सुरक्षा रक्षक व स्वच्छता कर्मचारी हे स्थानिक भूमिपुत्र असल्याचे आणि ते गेल्या १५ वर्षांपासून काम करत असल्याने त्यांना सेवेत कायम करावे अशी मागणी केली आहे.
सोबतच्या यादीतील कर्मचारी गेली अनेक वर्षे देवस्थानमध्ये सफाई व सुरक्षा विभागात तसेच कार्यालयीन कामकाजात कायम स्वरूपी कामावर कार्यरत आहेत. त्यांच्यावर संपूर्ण नियंत्रण प्रशासकीय मंदिर समितीचे आहे. २४० दिवसांच्यावर काम करत असलेल्या या कर्मचाऱ्यांना कायम करावे, अशी विनंती श्री. जाधव यांनी केली आहे.
याशिवाय, कर्मचाऱ्यांना कायम केल्याचे आदेशपत्र द्यावे, सरसकट वेतनवाढ मिळावी, महागाई भत्ता शासकीय नियमानुसार द्यावा, विविध प्रकारच्या रजा मंजूर कराव्यात, गणवेश व शूज उपलब्ध करून द्यावेत, देवस्थानतर्फे मोफत मेडिक्लेम पॉलिसी द्यावी, अपघाती किंवा नैसर्गिक आजाराने मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसास आर्थिक मदत द्यावी, तसेच बोनस, ओव्हरटाईम, शैक्षणिक खर्च इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशाही मागण्या श्री. जाधव यांनी केल्या आहेत.
मागण्या:
१. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये कायम केल्याचे आदेश पत्र द्यावे.
२. सरसकट वेतनवाढ मिळावी. अर्ज कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनात थेट रक्कम रु. १०,०००/- (दहा हजार रुपये) एवढी वाढ करण्यात यावी.
३. उपरोक्त वेतनवाढ ८०% मूळ वेतनात व २०% रक्कम इतर भत्यांमध्ये विभागून देण्यात यावी.
४. महागाई भत्ता शासकीय नियमानुसार झोन प्रमाणे देण्यात यावा.
५. रजा:
अ) हक्काची रजा (EL): प्रत्येक वर्षी २१ दिवस मिळाव्यात.
ब) आजारपणाची रजा (SL): प्रत्येक वर्षी १० दिवस मिळाव्यात.
क) किरकोळ रजा (CL): वर्षाला ९ दिवस मिळाव्यात.
ड) आपत्कालीन रजा: कायम कामगारांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास १० दिवसांची पगारी सुट्टी देण्यात यावी.
इ) हक्काची रजा (EL): ५ वर्षांतून एकदा वेळेस देण्यात यावी.
६. गणवेश: वर्षाला दोन जोडी गणवेश व शूज देण्यात यावेत.
७. मेडिक्लेम पॉलिसी:
१. देवस्थानतर्फे मेडिक्लेम पॉलिसी रु. ३,००,०००/- (अक्षरी तीन लाख रुपये) पर्यंत मोफत देण्यात यावी. (त्यामध्ये आई, वडील, पत्नी, दोन मुले) यांचा समावेश असावा.
२. पॉलिसीमध्ये न बसणाऱ्या किरकोळ आजारपणाचा होणारा संपूर्ण खर्च, बिल सादर केल्यानंतर दहा दिवसांच्या आत मिळावा.
३. देवस्थानमध्ये काम करताना जर एखाद्या कर्मचाऱ्यांना अपघात झाला, अथवा देवस्थान आवारात नैसर्गिक आजाराने जखमी अथवा आजारी झाला, तर त्याच्यावर देवस्थानने उपचार करावेत. डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिलेल्या कालावधीचा संपूर्ण पगार, पूर्ण भत्त्यांसह देण्यात यावा.
४. देवस्थानच्या सेवेत असलेल्या कोणत्याही कायम कर्मचाऱ्यांचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास, किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास, त्या कर्मचाऱ्यांच्या वारसास त्या वेळच्या त्या कर्मचाऱ्याला चालू असलेल्या वेतनाप्रमाणे सुमारे ५ वर्षांचे संपूर्ण वेतन देण्यात यावे. तसेच हजेरी पटावरील सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे ग्रॉस पेमेंटची जी रक्कम होते, ती रक्कम व त्याच्या दुप्पट रक्कम देवस्थानकडून कुटुंबाच्या वारसाला देण्यात यावी. त्या व्यक्तीच्या वारसास कायम कर्मचारी म्हणून कामावर घ्यावे.
८. बोनस, ओव्हरटाईम, शैक्षणिक खर्च:
अ) बोनस: दरवर्षी दिवाळीपूर्वी कायदेशीर बोनस देण्यात यावा.
ब) सानुग्रह अनुदान: कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी उत्तेजनार्थ रु. १०,०००/- (अक्षरी दहा हजार) बक्षीस म्हणून देण्यात यावेत.
क) ओव्हरटाईम: कर्मचाऱ्यांना दिला जाणारा ओव्हरटाईम हा त्यावेळेस मिळणाऱ्या पगाराच्या सर्व भत्त्यांसह दुप्पटीने देण्यात यावा. (प्रोसिजर पेमेंट ऑफ वेजेस ऍक्टमध्ये आहे.)
ड) शैक्षणिक खर्च: प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी रु. १०००/- देण्यात यावेत.
इ) ज्या कर्मचाऱ्यांचा मुलगा किंवा मुलगी त्या त्या शाळेत येतील, त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात यावे. (गुणवत्ता यादीत)