धाराशिव – धाराशिव शहरातील सांजा चौक उड्डानपुलाखाली मंगळवारी रात्री एका तरुणावर क्रूर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. रितेश बाबासाहेब कांबळे (वय २१, रा. शम्स सोसायटी) हा तरुण आपल्या कामानिमित्त उड्डानपुलाखाली असताना सोनु लाडे (वय ३०, रा. भवानी चौक) याने त्याला अडवले. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे कारण पुढे करत लाडे याने रितेशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने रितेशला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. इतक्यावरच न थांबता लाडे याने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि रितेशच्या अंगावर वार करण्यास सुरुवात केली.
या हल्ल्यात रितेश गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला आणि पायांना गंभीर दुखापत झाली आहे. रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी ही घटना पाहिली आणि तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रितेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी लाडे याने “वडापावची गाडी कशी लावतो ते बघतो” अशी धमकीही रितेशला दिली.
रितेश कांबळे यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोनु लाडे विरुद्ध भादंवि कलम ११८(१), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोनु लाडेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.