दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी, नरसिंग चव्हाण हा त्याच्या पत्नीसोबत शेतात काम करत असताना त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी भांडण सुरू केले. संतापाच्या भरात त्याने काठी आणि लोखंडी विळ्याने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिला डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.
जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, नरसिंग चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सत्र न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. अभियोग पक्षाने साक्षीदार आणि पुरावे सादर केले. न्यायालयाने आरोपीला कलम 307 अंतर्गत 10 वर्षांची सक्तमजुरी आणि 50,000 रुपयांचा दंड, तसेच कलम 504, 506 अंतर्गत प्रत्येकी 2,500 रुपयांचा दंड ठोठावला.
दिनांक. ०१.०९.२०२१ रोजी आरोपी नामे नरसिंग गोरोबा चव्हाण, रा. कोंड, ता.जि. उस्मानाबाद हा त्याच्या पत्नीसह कोंड शिवारातील त्यांच्या घरच्या शेतात उडीद मुग काढण्यासाठी गेले असता दुपारी ४ वा. चे सुमारास आरोपीने त्याच्या पत्नीसोबत तिच्या चारित्र्यावर संशय घेवुन भांडण केले व आरोपीने पत्नीला जीवे मारण्याचे उददेशाने त्याच्या हातातील काठीने डोक्यात मारले. तसेच लोखंडी विळयाने डोक्यात, तोंडावर, नाकावर, डोळयाजवळ जबर मारहाण केली. सदर मारहाणीमुळे जखमीच्या डोक्यात व चेह-यावर गंभीर जखमा झाल्या व दातही पाडले होते. तसेच डावा हातही फॅक्चर केला होता. सदरील गंभीर जखमा असतानाही पती आरोपी तेथुन पळुन गेला. त्या दरम्यान शेता शेजारील शेतकरी त्या ठिकाणी जमा झाले. त्यानंतर आरोपीचा मुलगा व इतर शेतक-यांनी जखमीस सुरूवातीस मुरूड येथील सरकारी दवाखाना व त्यानंतर लातुर येथील सहयाद्री हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.
त्यानंतर दि. ०३.०९.२०२१ रोजी आरोपीचा मुलगा सचिन नरसिंग चव्हाण याचे फिर्याद दिली की, माझे वडिल माझ्या आईच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचे व तिला नेहमी मारहान करायचे तसेच दि.०१.०९.२०२१ रोजी तिला जीवे मारण्याचे उददेशाने काठी व विळयाने तिला मारहान केली आहे सदर फिर्यादीवरून आरोपी नामे नरसिंग गोरोबा चव्हाण याच्या विरूध्द ढोकी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २६८/२०२१ कलम ३०७, ३२६, ५०४, ५०६ भा.द.वि. नुसार गुन्हा नोंद झाला. सदर गुन्हयाचा तपास सुरेश बनसोडे, सहा. पोलीस निरिक्षक व जगदिश राऊत, सहा. पोलीस निरिक्षक यांनी करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायाधिश -१ श्री. आर.एस. गुप्ता यांचे न्यायालयात पुर्ण झाली. सरकार पक्षातर्फे एकुण ११ साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सचिन एस. सुर्यवंशी ( अतिरिक्त शासकीय अभियोक्ता, धाराशिव ) यांनी काम पाहिले.
सत्र न्यायाधिश-१ श्री. आर. एस. गुप्ता यांनी प्रकरणात झालेला साक्षी पुरावा व अति. शासकीय अभियोक्ता सचिन एस. सुर्यवंशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी नरसिंग गोरोबा चव्हाण, रा. कोंड, ता.जि. धाराशिव यास कलम ३०७ अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी व रू ५०,०००/- रू द्रव्यदंड तसेच कलम ५०४, ५०६ अंतर्गत प्रत्येकी रू २५००/- द्रव्यदंड अशी शिक्षा दिनांक २३.०१.२०२५ रोजी सुनावली. सदर प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणुन महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल ब.नं. ११४९ एस.व्ही. दसवंत, व पोलीस कॉन्स्टेबल ब.नं. ८३६ एस.एन. शेळके, पो.स्टे. ढोकी यांनी काम पाहिले.