वाशी – जनावरांची निर्दयतेने वाहतूक केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अर्जुन भिमराव बनसोडे (वय 44), अमोल भिमराव बनसोडे (वय 35) आणि अंगद अरुण कुंभार (वय 35) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण भूम तालुक्यातील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तीन वाहनांमध्ये (छोटा हत्ती क्र. एमएच 25 पी. 4873, अशोक लेलंड दोस्त क्र. एमएच 25 ए.जे. 3164 आणि छोटा हत्ती क्र. एमएच 12 के.पी. 1608) 10 कालवडी, 4 म्हशी, 1 बैल, 1 गाय आणि 5 गोवंशीय वासरे अशी एकूण 20 जनावरे दाटीवाटीने बांधून त्यांची कत्तल करण्यासाठी बेकायदेशीर वाहतूक करत होते.
या जनावरांची किंमत 2,55,000 रुपये असून वाहनांची किंमत 12,00,000 रुपये आहे. वाशी-सरमकुंडी रोडवर रामकुंड पाटीजवळ सुदर्शन सुभाष पंडित (वय 28) यांना ही जनावरे निर्दय अवस्थेत आढळून आली. त्यांनी तात्काळ वाशी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना अटक केली आणि जनावरांची सुटका केली. आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूर वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1), 11(1)(अ), 11(1)(एफ), 11(1)(एच), 11(1)(आय) आणि प्राण्यांचे परिवहन अधिनियम कलम 47, 54, 56 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.