धाराशिव – पालकमंत्री बदलले, पण ‘पैसे उकळण्याचा’ तोच फॉर्म्युला! जिल्ह्याचे नवे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच पदभार स्वीकारला, पण त्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या निवडीनेच पहिल्याच दिवशी चर्चांना ऊत आला आहे. कारण नवनियुक्त स्वीय सहाय्यक म्हणजे चक्क ‘टोल वसुली’चा जुना वादग्रस्त चेहरा! यामुळे ‘गडाख काळ रिटर्न्स’चा ट्रेलर पाहायला मिळतोय.
हाच पॅटर्न, तेच डायलॉग!
मागच्या काळात टोल वसुलीचे आरोप झेललेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा वर्णी लागत असेल, तर ‘येरे माझ्या मागल्या’ची स्थिती ओघानेच येणार! मंत्री बदलले तरी ‘पैसे उकळणाऱ्या’ हातांची चटक कायम असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जनतेच्या समस्या सोडवण्यापेक्षा ‘कमिशन’चे गणित अधिक महत्वाचे ठरणार की काय, अशी भीती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
पालकमंत्र्यांचा नवा ‘संपर्क अधिकारी’ की ‘संपत्ती अधिकारी’?
नव्या पालकमंत्र्यांकडे जिल्ह्यातील नागरी समस्या, रखडलेली विकासकामे आणि प्रशासनाच्या गडबडगुंडीतून बाहेर पडायचे मोठे आव्हान आहे. पण जर त्यांच्या संपर्क अधिकाऱ्यानेच ‘दहा टक्के कमिशन’ घेतल्याशिवाय फाइल हलवायची नाही, असा शिस्तबद्ध नियम पाळायचा ठरवला, तर जनतेने थेट ‘चिरीमिरी’ सोबत अर्ज द्यायला सुरुवात करावी!
गडाख ते सरनाईक – ‘स्वीय सहाय्यक’चा ट्रॅक रेकॉर्ड तसाच
शिवसेना नेत्यांच्या पालकमंत्रीपदाच्या इतिहासाकडे पाहिले, तर अर्जुन खोतकर, दिवाकर रावते, दीपक सावंत यांच्या काळात काहीसा ‘संपर्क अधिकारी’ हा जोड भूमिका बजावत होता. मात्र, शंकरराव गडाख यांच्या काळात स्वीय सहाय्यकाने टोल वसुलीच्या नव्या परंपरा घडवल्या होत्या. आता सरनाईक यांच्या काळातही ‘त्याच डाव्या उजव्या हातांनी’ पुन्हा कमिशनचे खेळ खेळले जाणार का, हाच मोठा प्रश्न जिल्ह्यातील जनतेला पडला आहे.
जनतेचा ‘टोल’ वाढणारच?
विकासकामांपेक्षा ‘वसुली योजनां’मध्ये जास्त रस असलेल्या अधिकाऱ्यांकडे पुन्हा सूत्रे गेल्यास, जिल्ह्याचा विकास बाजूला राहणार आणि ‘खुर्चीवरच्या वसुली बहाद्दरांची’ चलती राहणार! त्यामुळे ‘स्वीय सहाय्यक’च्या निवडीवर मंत्री सरनाईक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाहीतर ‘फाईलसाठी पैसे – निर्णयासाठी आणखी पैसे’ हा फंडा जिल्ह्यात नवा नाही!
‘रीत’ बदलणार की ‘नो’टांची रीती कायम राहणार?
आता बघायचं फक्त एवढंच – जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांवर स्वीय सहाय्यक काही उपाय शोधणार का फक्त ‘कमिशनच्या ताटात वाढ’ करणार? ‘टोल माफिया’ परतल्याच्या चर्चेमुळे जिल्ह्यात हलकल्लोळ माजला आहे. आता मंत्री सरनाईक यावर काय भूमिका घेतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे!