धाराशिव : सांजा येथे कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीत एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जाकीर शब्बीर तांबोळी (वय ३०, रा. शिवाजीनगर सांजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना आरोपी राजू शब्बीर तांबोळी, जरीन राजू तांबोळी, महताब रसूल शेख, जिंदावली महताब शेख, बेबी महताब शेख आणि मेहर रमजान तांबोळी यांनी 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता मारहाण केली. कचरा टाकण्याच्या कारणावरून वाद झाला आणि आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ केली, लाथाबुक्क्यांनी, स्टीलचा पाईप व विटाने मारहाण करून जखमी केले, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या मारामारीत जाकीर तांबोळी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
जाकीर तांबोळी यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 189(2), 191(1), 191(3) आणि 190 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत.