धाराशिव : सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील तब्बल १ लाख ८० हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार कैलास पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने अनुदान वितरीत करण्याची मागणी केली आहे.
अनुदान मंजूर पण वितरण अपूर्ण
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २२१ कोटी ८१ लाख ३० हजार ०८० रुपये इतकी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ १५,३९१ शेतकऱ्यांना २३ कोटी ५३ लाख ६६ हजार ४३८ रुपये वितरीत करण्यात आले आहेत. यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.
चार तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई नाही
विशेषतः कळंब (६५,३३१), परंडा (१४,३९५), लोहारा (३७०) आणि वाशी (३५,०७५) या चार तालुक्यांतील एकाही शेतकऱ्याला अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीला सहा महिने उलटले असतानाही अद्याप मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
एप्रिल-मेच्या अवेळी पावसाचे अनुदानही बाकी
एप्रिल आणि मे २०२४ मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळेही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक वाया गेले. या नुकसानीसाठी २,८३७ शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली होती, मात्र फक्त १,३८३ शेतकऱ्यांना २ कोटी २४ लाख ७२ हजार ३७५ रुपये अनुदान मिळाले. उर्वरित शेतकऱ्यांना मदत तातडीने देण्याची गरज असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.
“शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना वेळेत मदत मिळत नाही, हे दुर्दैवी आहे. सरकारने तातडीने अनुदान वितरित करावे,” अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.