कधीकाळी इतिहासाने भारावलेलं धाराशिव शहर, जिल्ह्याचं मुख्यालय म्हणून ओळखलं जातं. आता नाव बदलून धाराशिव झालं, पण स्थिती? ती मात्र आजही जुनीच! समस्यांनी वेढलेलं शहर, विकासाच्या नावाने केवळ घोषणांचा पाऊस आणि प्रत्यक्षात वाळवंट.
लाईट गेली, की कधीच आली नाही?
रात्रीच्या वेळी शहरात फिरायचं झालं, तर आधी स्वतःचा टॉर्च घेऊन निघावं, नाहीतर वाहनाचे दिवे तरी व्यवस्थित असावेत! कारण रस्त्यावरच्या स्ट्रीट लाईट केवळ खांबांवरच्या शोभेच्या वस्तू. काहींना बल्ब नाही, काहींमध्ये करंट नाही, आणि काहींना नियोजनाचा लयलेशा नाही. नगरपालिकेला विचारलं, तर त्यांच्या फायलींमध्ये हे दिवे तेजोमय प्रकाशमान दिसतील, पण प्रत्यक्षात शहर अंधारातच.
रस्ते म्हणजे खड्डे की खड्ड्यात रस्ते?
धाराशिवच्या रस्त्यांवरून गाडी चालवायची म्हणजे ‘ऑफ-रोडिंग’चा अनुभव घ्यायचा! 3-3 फूट खोल खड्डे, उखडलेले रस्ते, ठिकठिकाणी डागडुजीच्या नावाखाली केलेले तुकडे. परिणामी वाहनंही तुकड्या-तुकड्यांनी प्रवास करतात.
शहरात उद्यान? ते फक्त जाहीरनाम्यात!
धाराशिवसारख्या शहरात निदान एक तरी व्यवस्थित उद्यान असावं, पण सध्या ‘उद्यान’ हा प्रकार निव्वळ आश्वासनांमध्येच अस्तित्वात आहे. जीजामाता उद्यान कधीकाळी मुलं खेळायची जागा होती, पण आता तिथे गर्दुल्लेच राज करताना दिसतात. सुशोभिकरणाच्या घोषणा निवडणुकीनंतर झाडांच्या पानांसारख्या गळून पडतात.
भाजीमंडई – शेतकऱ्यांसाठी कुठे जागा आहे?
जिल्हा मुख्यालय असलेल्या शहरात ग्रामीण भागातून आलेले शेतकरी भाजीपाला विकायला कुठे बसणार? हे प्रश्न कुणालाही पडत नाहीत. कारण नेत्यांची तोंडी आश्वासनं आणि जमिनीवर अस्तित्व नसलेले प्रकल्प यामध्ये हे प्रश्न हरवून गेले.
बसथांबे की धुळीचे ढीग?
शहराचे मुख्य बसथांबे – बार्शी नाका, लेडिज क्लब, देशपांडे सँड – इथे प्रवाशांसाठी कसलीही सुविधा नाही. उन्हातून, पावसातून प्रवाशांनी बसची वाट बघायची आणि निवारा नसल्याने उभं राहायचं. स्त्रियांसाठी कुठेच स्वच्छतागृह नाही. मग ही मूलभूत सोयी कोण पाहणार?
कचराच कचरा, जबाबदारी कोणाची?
शहरभर कचर्याचे ढीग, मोकाट डुकरे, कुत्रे, घाणीचा साम्राज्य. कोणत्याही गल्लीबोळात जा, सांडपाण्याचा वास तुमच्या स्वागतासाठी तत्पर! नगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमा कागदोपत्री मोठ्या धडाक्यात चालतात, प्रत्यक्षात मात्र गल्लीबोळ दुर्गंधीच्या विळख्यात.
वाहतूक विस्कळीत, सुशोभिकरणाचा गोंधळ
मुख्य चौकांत सुशोभिकरणाच्या नावाखाली उभ्या केलेल्या प्रतिकृती आणि त्यात भर म्हणून झालेली अतिक्रमणं. परिणामी वाहतुकीचा गोंधळ! शहराचा श्वास कोंडल्यासारखा वाटतो, पण प्रशासन मात्र ‘सजावट सुंदर आहे’ म्हणत झोपलेलं!
निवडणुका हव्यात तरी कशाला?
दरवेळी निवडणुका आल्या की घोषणा होतात – शहराचा विकास, सुशोभिकरण, वाहतूक सुधारणा, स्वच्छता, उद्याने, बाजारपेठ नियोजन, सुरक्षितता! पण मतं मागायला आलेल्यांना पुढच्या निवडणुकीपर्यंत शहर कसं दिसतं याची फिकीरही नसते. मग पुन्हा घोषणा आणि नागरिकांसाठी पुन्हा तोच भोग!
धाराशिवचं नाव बदललं, पण प्रश्न मात्र ‘तस्सेच’ आहेत. आता तरी या प्रश्नांवर तोडगा निघेल का? की नाव बदलण्यापलीकडे काहीही होणार नाही?