धाराशिव – धाराशिव शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ राहणाऱ्या राहुल राजाभाऊ यादव यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेला ऐवज आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण १.११ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
राहुल यादव हे २५ ऑक्टोबर रोजी सकाळी घराला कुलूप लावून कामावर गेले होते. त्याच दरम्यान, सकाळी ९ ते ११ या वेळेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे कानातील फुले (१२,०००₹ किंमतीचे) व रोख रक्कम ४,०००₹ असा एकूण १६,०००₹ किमतीचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी राहुल यादव यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून पोलिसांनी सौरभ हरीदास काळे (रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) याला अटक केली.
अटक करण्यात आलेल्या सौरभ काळे याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरी गेलेले सोन्याचे कानातील फुले (७,०००₹ किंमतीचे), रोख रक्कम (४,०००₹) आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल (एमएच २३ बीजे ८११२, अंदाजे १,००,०००₹ किंमतीची) असा एकूण १.११ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सौरभ काळे याच्याकडे अधिक चौकशी सुरू असून, त्याच्या इतर गुन्ह्यांची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, ग्रेड पोलीस निरीक्षक देविदास हावळे, पोहेकॉ पठाण, पोअं-जमादार आणि मपोअं-देशमुख यांच्या पथकाने केली आहे.