धाराशिव: कसबे तडवळे येथे जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे. विवेक विश्वनाथ उबाळे (रा. कसबे तडवळे) यांनी सुरज मधुकर कानगे (वय 20) आणि त्यांचे वडील मधुकर कानगे यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी विवेक उबाळे यांच्या पत्नीला फिर्यादीच्या भावाने काहीतरी बोलल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. उबाळे यांनी कानगे पिता-पुत्रांना लाथाबुक्यांनी, कोयत्याने आणि दगडाने मारहाण केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. उबाळे यांनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
फिर्यादी सुरज कानगे यांनी 18 फेब्रुवारी 2025 रोजी ढोकी पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यानुसार, आरोपी विवेक उबाळे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 118(1), 118(2), 352, 351(2)(3) आणि अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम कलम 3(1)(आर), 3(1)(एस), 3(2)(व्हिए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.