तुळजापुरात ड्रग्जचा व्यवसाय बहरत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. मंदिरात झालेल्या या बैठकीत पुजारी, नागरिक, आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये वादंग निर्माण झाला.
२ हजार युवक ड्रग्जच्या विळख्यात?
तुळजापुरातील वाढत्या ड्रग्ज व्यवसायाबद्दल पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी यापूर्वीच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना माहिती दिली होती, तसेच काही नावांची यादीही सादर केली होती. मात्र, कारवाईऐवजी पोलिस अधिकाऱ्यांकडूनच उलट दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
डीवायएसपींची आक्रमक भूमिका – संतापाची लाट
बैठकीदरम्यान, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट पोलीस अधीक्षकांची हजेरी घेतली. यावेळी डीवायएसपी निलेश देशमुख यांनी विपीन शिंदे यांच्यावरच आवाज चढवला आणि “कुठे नावे दिली?” अशी उलटतपासणी सुरू केली. त्यावर पालकमंत्र्यांनी “नावे लीक करायची का?” अशी विचारणा करत त्यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.
धमकी आणि संतप्त प्रतिक्रिया
बैठक संपल्यानंतर बाहेर पडताच डीवायएसपी देशमुख यांनी विपीन शिंदे यांना नोटीस देण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पुन्हा पालकमंत्री सरनाईक यांच्याकडे धाव घेतली आणि डीवायएसपींच्या वर्तनाविरोधात तक्रार केली.
“मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी लागेल” – सरनाईकांची तंबी
या प्रकरणी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट पोलिस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. “माझ्यासमोर धमकी देता का? तुमची तक्रार मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करावी लागेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
या संपूर्ण प्रकरणामुळे तुळजापुरातील वाढत्या ड्रग्ज व्यवसायावर प्रशासन किती गांभीर्याने लक्ष देत आहे, यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Video