धाराशिव जिल्ह्यातील वाढत्या ड्रग्जच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. तुळजापूरपुरतेच नव्हे, तर धाराशिव शहर आणि विशेषतः परंडा तालुक्यात या अमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढी अडकत चालली आहे. प्रशासन आणि पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
परंड्यात ड्रग्ज माफियांचे साम्राज्य
परंडा तालुक्यातील परिस्थिती तर अधिकच गंभीर आहे. बिहारसारख्या टोळीशाहीचा अनुभव येथे दिसून येतो. स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांनी ड्रग्ज, गांजा, मटका यांसारख्या अवैध धंद्यांवर आपला अंमल प्रस्थापित केला आहे. हॉटेलमध्ये साधा मदतनीस म्हणून काम करणाऱ्या तरुणांपासून मोठ्या रॅकेट्सपर्यंत ही साखळी पोहोचली आहे. यात शेकडो तरुणांना गुन्हेगारीच्या चक्रात अडकवले जात आहे.
शेकडो कुटुंबे उध्वस्त – पोलीस निष्क्रीय?
या विळख्यात अडकलेल्या अनेक कुटुंबांनी परंडा सोडून पुणे आणि संभाजीनगरकडे स्थलांतर केले आहे. काहींची तरुण मुले या व्यसनांमुळे अकाली मृत्युमुखी पडली आहेत. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात घडणाऱ्या या घटनांवर कारवाई का होत नाही, हा मोठा प्रश्न आहे.
अवैध पैशांच्या जोरावर पोलिस यंत्रणा कोलमडली?
या संपूर्ण व्यवस्थेमध्ये काही पोलिस अधिकारी आणि गुन्हेगारी टोळ्यांमधील आर्थिक देवाणघेवाणीचे आरोपही सातत्याने होत आहेत. महिना लाखोंच्या हप्त्यांमुळे काही पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचे आरोप समोर येत आहेत. जर या प्रकरणावर ठोस आणि कठोर कारवाई झाली नाही, तर धाराशिव जिल्ह्यातील पुढची पिढी विनाशाच्या मार्गावर जाईल.
कारवाई झाली नाही तर आंदोलन अटळ!
यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. जर वेळेत कारवाई झाली नाही, तर मोठ्या आंदोलनाची तयारीही सुरू असल्याचे बोलले जात आहे.
प्रशासन या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालणार का, की हात झटकणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.