ढोकी (ता. धाराशिव) – तेर शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात काढून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चरणसिंग विजयसिंग राजपूत (वय २८, रा. तेर, ता. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे तेर शिवारातील गट क्रमांक ४१० मध्ये सहा एकर क्षेत्रावर हरभऱ्याचे पीक होते. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८.४० च्या सुमारास त्यांनी शेतातून हरभरा काढून गंज स्वरूपात ठेवला होता. मात्र, अज्ञात व्यक्तीने या गंजीला आग लावली, ज्यामुळे संपूर्ण हरभरा जळून खाक झाला. या आगीत सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेबाबत चरणसिंग राजपूत यांनी २५ फेब्रुवारी रोजी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३२४(५) आणि ३२६(एफ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.