धाराशिव : शहरातील बसस्थानक परिसरात एका गटारी वादातून मोठ्या प्रमाणावर हाणामारी झाली. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात 26 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगेश रामरासराव काटे (वय 35, रा. समता नगर, धाराशिव) हे त्यांचे मित्र संदीप साळुंके व कुलदीप कदम यांच्यासह बसस्थानक परिसरात असताना, आरोपी तनवीर मुजावर आणि इतर 25 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी “फर्शी बसवण्याचे काम सुरू आहे, तुम्ही येथे थांबा” असे सांगत शिवीगाळ केली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
हल्लेखोरांनी लाथाबुक्यांसह लोखंडी गज, काठी व दगडांनी प्रहार करून तिघांना गंभीर जखमी केले. तसेच, त्यांचे सोन्याचे दागिने काढून घेत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर जखमींवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यांच्या जबाबावरून आनंदनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 118(1), 115(2), 119(1), 352, 351(2), 351(3), 189(2), 190, 191(2), 191(3) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक कार्यरत आहे.
शिंगोली येथे शेतमालाच्या वादातून मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
धाराशिव : शिंगोली गावात घरासमोरील वांगे आणि टोमॅटोची झाडे तोडण्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोरख तात्याबा ओव्हाळ (वय 55, रा. शिंगोली, ता. जि. धाराशिव) यांना त्यांच्या घरासमोरील पिकांवरून वाद उफाळल्याने आरोपी आबा शितोळे, साळुबाई शितोळे आणि रतनबाई (रा. शिंगोली) यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी तसेच विट आणि काठीने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.
इतकेच नव्हे, तर आरोपींनी फिर्यादी यांच्या पत्नीला देखील शिवीगाळ करून काठी व विटांनी मारहाण केली. तसेच, जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी फिर्यादी गोरख ओव्हाळ यांनी वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर दिलेल्या जबाबावरून आनंदनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 118(1), 117(2), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
काटी येथे हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील काटी येथे एका कुटुंबावर हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुवर्णा तानाजी राउत (वय 35, रा. काटी, ता. तुळजापूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 24 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास सलून दुकानासमोर त्यांचे पती तानाजी राउत आणि मुलांवर सुशांत बालाजी ढगे, विशाल बालाजी ढगे, अनिल ढगे, बालाजी ढगे, प्रथमेश बनसोडे आणि नितीन वाघमोडे (सर्व रा. काटी) यांनी संघटितपणे हल्ला केला.
आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली, तसेच लोखंडी रॉडने गंभीर जखमी केले. यावेळी जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 118(1), 296, 115(2), 352, 351(2), 351(3), 189(1), 189(2), 191(2), 190 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.
सारोळा येथे अविश्वास ठरावावरून वाद; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
तुळजापूर : तालुक्यातील सारोळा गावात सरपंच आणि उपसरपंचावरील अविश्वास ठरावावर सही करण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून चौघांनी एका व्यक्तीला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शिवाजी शहाजी कांबळे (वय 30, रा. सारोळा, ता. तुळजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास योगेश बाळासाहेब पाटील, विनोद बाळासाहेब पाटील, प्रविण विठ्ठल नागदे आणि सुशिल राम धनके (सर्व रा. सारोळा) यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
आरोपींनी अविश्वास ठरावावर सही करण्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी फिर्यादी शिवाजी कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(1)(आर)(एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.