धाराशिव शहरातील शेकापुर रोड, बालाजी नगर येथे सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापारावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत एक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका महिलेकडून घरामध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात आहे. खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. माहिती खरी असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.
मुख्य सूत्रधाराला अटक
यावेळी पोलिसांना एक महिला संशयास्पद स्थितीत आढळली. चौकशीत, रत्नमाला सतीश मदने (वय 46, रा. शेकापुर रोड, बालाजी नगर) हीच्याकडून महिलांना वेश्या व्यवसायात ढकलले जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तिच्या ताब्यातून ₹7,900 रोख रक्कम आणि निरोधच्या पाकिटांसह ₹7,970 चा मुद्देमाल जप्त केला.
रत्नमाला मदने हिच्याविरुद्ध भा.न्या. सं. कलम- 143, 144, सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5,7 अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे आणि त्यांच्या पथकाने केली.
धाराशिवमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक वाढला असून, अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.