धाराशिव – हिंगळजवाडी येथे शेळ्या चोरण्याच्या प्रयत्नाला अडथळा ठरलेल्या शेतकऱ्याचा चोरट्यांनी दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली असून, संतप्त ग्रामस्थांनी आज रास्ता रोको आंदोलन करत आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
घटना कशी घडली?


मृत तानाजी भगवान मुळे (वय 65, रा. हिंगळजवाडी) यांच्या शेतशेडमध्ये २ मार्चच्या मध्यरात्री काही अज्ञात चोरटे घुसले. त्यांनी शेळ्या चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र शेळ्या ओरडू लागल्याने मुळे यांना जाग आली. त्यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर बेदम हल्ला केला. दगडाने त्यांच्या डोक्यावर वार करत त्यांचा जागीच खून केला.
ग्रामस्थांचा संताप – रास्ता रोको आंदोलन
या अमानुष घटनेमुळे हिंगळजवाडीतील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आज (३ मार्च) सकाळी शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. “शेतकऱ्यांचा जीव असुरक्षित आहे, पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी!” अशी मागणी करत ग्रामस्थांनी घोषणा दिल्या.
आरोपी फरार, तपास सुरू
या प्रकरणी संजय राजेंद्र पवार, जितेंद्र प्रभू पवार (रा. तेर, धाराशिव), अमोल ईश्वर काळे आणि ईश्वर रामा काळे (रा. हिंगळजवाडी, धाराशिव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.
गावात भीतीचे वातावरण
या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “शेतकऱ्यांच्या जीवाची काही किंमत राहिली आहे का?” असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने हालचाल करून आरोपींना अटक करावी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हजारे करत आहेत.