तुळजापूर: धाराशिव रोडलगत तुळजापूर शहरात यात्रा मैदानासाठी राखीव असलेल्या सात एकर जागेच्या संरक्षणासाठी आज (३ मार्च) पासून असंख्य महिलांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. देविभक्तांना आणि यात्रेकरूंना सोयीसाठी हे मैदान हवेच, असा ठाम निर्धार महिलांनी व्यक्त केला असून, तहसीलदारांना निवेदन देऊन लढ्याची सुरुवात केली आहे.
सरकारचा ठराव बदलला, यात्रा मैदानाच्या जमिनीवर डाव!
१९८९ साली शासनाने यात्रा मैदानासाठी राखीव ठेवलेली सात एकर जागा पुढाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून हडपल्याचा आरोप महिलांनी केला आहे. महिलांच्या म्हणण्यानुसार, सत्तेवर आल्यानंतर काही नेत्यांनी ठराव बदलला, फेरफार गायब झाले आणि डुप्लिकेट पीआर कार्ड तयार करून काही प्लॉट विक्री करण्यात आले. परिणामी, सात एकरपैकी फक्त तीन एकर जागा उरली असून, उर्वरित जागेवर मोठ्या प्रमाणावर इमारती उभ्या राहिल्या आहेत.
महिलांचा निर्धार – लढा सुरूच राहणार!
महिलांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत यात्रा मैदानाची जागा शासनाच्या नावे होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार. प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही महिलांनी दिला आहे.
महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर
यात्रा मैदानासाठी लढा देण्यासाठी शहरातील असंख्य महिला तहसील कार्यालयासमोर उपस्थित राहिल्या. “देविभक्त आणि यात्रेकरूंसाठी हे मैदान राखीव ठेवले गेले होते, पण आता काही लोकांच्या स्वार्थासाठी तेच गायब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही,” असे संतप्त महिलांनी सांगितले.
प्रशासनाची भूमिका महत्त्वाची!
या आंदोलनावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण तुळजापूरचे लक्ष लागले आहे. महिलांचे उपोषण सुरूच राहणार असल्याने प्रशासनाला लवकरच भूमिका स्पष्ट करावी लागेल.