हिंगळजवाडी (ता. धाराशिव) गावाच्या शिवारात घडलेल्या एक धक्कादायक घटनेत अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध शेतकऱ्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली. ही घटना दोन मार्च रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली.
तानाजी भगवान मुळे (वय ६५, रा. हिंगळजवाडी) यांच्या शेतात काही अज्ञात चार ते पाच चोरटे घुसले आणि त्यांनी बकरी व शेळ्या चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेळ्या घेऊन जात असताना एक शेळी जोरात ओरडली, त्यामुळे तानाजी मुळे यांना जाग आली. चोरट्यांना अडवण्यासाठी त्यांनी आरडाओरड केली आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
यामुळे संतप्त झालेल्या चोरट्यांनी त्यांच्यावर बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे, तर त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांचा निर्घृण खून केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने धाराशिव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेत चोरट्यांनी एका बकऱ्याची मुंडी मुरगळून त्याचे पोट फाडले आणि त्याला झाडावर फेकून दिले. या अमानुष कृत्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


या घटनेमुळे हिंगळजवाडी आणि परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक व शेतकरी करत आहेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.