धाराशिव: जिल्ह्यातील विविध भागांत असलेल्या सोलर प्लांट आणि पवनचक्की प्रकल्पांमधून महागडे साहित्य व तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ६ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या अटकेमुळे जिल्ह्यातील तब्बल १० चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
शिवाजी उर्फ नाना संजय काळे (रा. खामकर पारधी पेढी, ता. वाशी, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून, त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही (नाबालिग) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोपनीय माहितीवरून येडशीत सापळा
धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा, रुईभर, कौडगाव, ढोकी, साबळेवाडी, आरसोली (ता. भूम), तसेच गौरगाव आणि मस्सा (ता. कळंब) या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सोलर आणि पवनचक्की प्रकल्पांना लक्ष्य करून तांब्याच्या केबल चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. हे गुन्हे अतिसंवेदनशील व गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
दरम्यान, ७ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने येडशी (ता. जि. धाराशिव) परिसरात दबा धरून बसत, संशयास्पदरीत्या जाणाऱ्या एका टाटा सुमो वाहनाला शिताफीने अडवले आणि वाहनातील दोघांना ताब्यात घेतले.
१९५ किलो तांब्याच्या तारा जप्त
ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने जिल्ह्यातील विविध शिवारांमधून सोलर आणि पवनचक्की प्लांटवरील तांब्याच्या तारा असणाऱ्या केबल्स चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो गाडी आणि तब्बल १९५ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा असा एकूण ६ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या हवाली करण्यात आला आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व पथकाची कामगिरी
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोलीस अंमलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, कोळी, रत्नदीप डोंगरे आणि नागनाथ गुंजकर यांच्या पथकाने केली.






